विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा शेवटचा दिवस असताना कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं आहे. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची राजकीय कोंडी झाली आहे. या सगळ्यावर भाजपचे नेते आणि सतेज पाटलांचे कट्टर विरोधक धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या शाहू महाराजांचं नाव घेत सहा महिन्यांपूर्वी गादीचा मान गादीचा मान म्हणत मतं मागत होते. त्याच महाराजांना आज अर्वाच्य भाषेत सतेज पाटील बोलत होते, असं म्हणत धनंजय महाडिकांनी बंटी पाटलांवर निशाणा साधला आहे.
हे एवढे मोठे झालेत का? की राजघराण्यावर बोलू लागलेत. स्वत: च्या राजकीय स्वार्थासाठी हे राज घराण्यावर बोलू लागलेत. महाराजांवर अर्वाच्य भाषेत बोलावं, एवढी यांच्यात घमेंड आली आहे. जे काही चित्र निर्माण झालंय ते कोल्हापूकरांनी पाहिलं आहे. कोल्हापूरकर राज घराण्याचा अवमान सहन करणार नाहीत, असं धनंजय महाडिकांनी म्हटलं.
बातम्यांमधूनच मला कळालं की छत्रपती शाहू महाराज हे राजीनामा देणार आहेत. आज ज्या पद्धतीने त्यांचा अवमान झाला आहे, हे कुणीही सहन करू शकणार नाही. कोल्हापूरच्या राज घराण्याबाबत अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं धाडस आजपर्यंत कुणीही करू शकणार नाही. पण सतेज पाटील आता स्वत: ला सर्वोच्च समजत आहेत. त्यांनी राज घराण्याबाबत जे वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे शाहू महाराजांचं मन दुखावलं असणार आहे. हे अतिशय वेदनादायी आहे. कोल्हापूरकर हे सगळं सहन करणार नाही, असं धनंजय महाडिक म्हणालेत.
विधानसभा निवडणुकीच्या या रणसंग्रामात कोल्हापूरच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आलाय. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतली आहे. मधुरिमाराजेंनी माघार घेताच काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना राग अनावर झाला. दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग… मी पण दाखवली असती माझी ताकद! असं सतेज पाटील म्हणाले. यावरच आता धनंजय महाडिकांनी टीका केली आहे.