Gopichand Padalkar on Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यामुळे आता विविध मुद्द्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यातच आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांनी महाराष्ट्र लुटायचंचं काम केलं आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत गोपीचंद पडळकर हे शरद पवारांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. पवारांना महाराष्ट्राला जातीवाद निर्माण करायचा आहे का? पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं का? महाराष्ट्रात जातीजाती, दलित, ओबीसी यांच्या अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का? असा प्रश्नही शरद पवारांनी उपस्थित केला.
शरद पवार म्हणतात सत्ता हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल. तुमच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅंन्सर झाला आहे. ५०-६० वर्षे आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्र लुटायचंचं काम केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी हरवली पवारांमुळं. पवारांचा शासनकाळ हा महाराष्ट्राच्या इतिहासाची काळी पानं आहेत. आता महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकासाचा चेहरा मिळाला आहे. तो बदलवून पवारांना पुन्हा महाराष्ट्रावर सरंजामी लादायची आहे का? दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का? हा माझा थेट सवाल आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
@PawarSpeaks म्हणतात, “सत्ता हातात आल्यावर महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल.” पण पवार साहेब, तुमच्यामुळेच महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला. ५०-६० वर्ष महाराष्ट्र लुटणं, शिवरायांच्या तेजाची झळाळी हरवणं, हेच तुमचं वारसाहक्क आहे. महाराष्ट्राचा सर्वसमावेशक… pic.twitter.com/5iLER6SX2E
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 16, 2024
“शरद पवार म्हणतात सत्ता हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल. मी शरद पवारांच्या अर्ध्या वक्तव्याशी सहमत आहे. महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची जी आवश्यकता होती, ती देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली आहे. शरद पवारांमुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर झाला. ५०-६० वर्ष शरद पवारांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता होती. त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जी तेजाची झळाळी दिली होती. ती एकट्या पवारांमुळे हरवली आहे. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र जो 18 पगड जातींचा आणि 12 बलुतेदारांचा तो 50 वर्ष पवारांनी स्वत:ची प्रायव्हेट कंपनी म्हणून चालवला. आधी फक्त पवार प्रायव्हेट कंपनी होती आता पवार आणि सुळे प्रायव्हेट कंपनी असा झाला आहे”, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
“जातीजातीमध्ये वाद लावायचा, महाराष्ट्रात वातावरण अशांत ठेवायचं आण प्रस्थापितांची घरे भरण्याचे काम पवारांनी केले आहे. याला कंटाळून महाराष्ट्रातील लोकांनी 2014 साली परिवर्तन केला. पवारांचा जो शासनकाळ होता तो काळाकुट्ट होता. शरद पवारांनी भ्रष्टाचार, जातीवाद केला. लोकांमध्ये भांडण लावली. आता मला त्यांनी विनंती करायची आहे की, निवांत राहा , हरीनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये चांगले काम करण्याची इच्छा जागृत होईल. देवेंद्र फडणवीसांनी २०१४ ते २०१९ आणि शिंदे-फडणवीस यांनी महाराष्ट्राला परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राला नंबर एक बनवलं आहे. आज महाराष्ट्रातील युवकांच्या हाताला काम मिळतंय. वेगवेगळे उद्योजक महाराष्ट्रात येतात. महिलांचं संजीवनीकरण मोठ्या प्रमाणात होतंय. महाराष्ट्राची ही प्रगती पवारांना कुठेतरी खुपतेय. आज महाराष्ट्राला एक आश्वासक चेहरा मिळाला आहे. तो बदलून पवारांना महाराष्ट्राला जातीवाद निर्माण करायचा आहे का? पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं का? महाराष्ट्रात जातीजाती, दलित, ओबीसी यांच्या अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का?” असा सवालही गोपीचंद पडळकरांनी केला.