Harshvardhan Patil Join Sharad Pawar Party : इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या वृत्तांवर शिक्कामोर्तब केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल एक मोठा गौप्यस्फोटही केला.
हर्षवर्धन पाटील हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत होते. हर्षवर्धन पाटील हे लवकरच भाजप सोडून शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चाही रंगली होती. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेटीही घेतली होती. या भेटीनंतर या चर्चांना उधाण आले होते. त्यातच आता हर्षवर्धन पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमका काय निर्णय घ्यायचा याचा विचार सुरू होता. चार पाच दिवसांपूर्वी फडणवीस यांच्याशी चर्चा केली. दीड दोन तास भेट झाली. त्यांनी काही प्रस्ताव समोर ठेवले. मी काही भूमिका मांडली. चर्चेअंती त्यांनी सांगितलं की, इंदापूरची जागा ही महायुतीतील विद्यमान आमदार लढवतील. दुसरा पर्याय तुमच्याबाबत काढू. पण दुसरा पर्याय जो होता. तो माझ्या कार्यकर्त्यांची त्याला संमती नव्हती. मला दुसरा पर्याय स्वीकारणं, व्यक्तीगत माझ्यासाठी संयुक्तीक ठरला असता. पण राजकारणात आणि समाजकारणात व्यक्तीगत प्रश्नापेक्षा जनतेचा प्रश्न असतो. सविस्तर चर्चा झाली, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.
त्यानंतर परवा शरद पवार यांचा निरोप आला. सिल्व्हर ओकला भेटायला या. या पूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक होती. त्यावेळी शरद पवार म्हणाले राजकीय भूमिका काय घेणार. त्यावेळी चर्चा झाली नाही. पण काल दीड तास शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. सुप्रिया सुळे होत्या. जयंत पाटील फोनवर होते. पवार म्हणाले, मी इंदापूरचा कानोसा घेतला. त्यांना म्हटलं तुमचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात या. मी म्हटलं, इंदापूरला जाऊन कार्यकर्त्यांना विचारतो. कार्यकर्त्यांना विचारलं. तेव्हा कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात जावं असा आग्रह होता.
आज मी घोषित करतो की, मी आमचे पदाधिकारी आज शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी हा निर्णय जाहीर करतो, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
“भाजपच्या नेत्यांसोबत काम केलं आहे. मी रावसाहेब दानवे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोललो. त्यांना निर्णयाची कल्पना दिली आहे. त्यामुळे हा निर्णय जाहीर करत आहे. इंदापूरमध्ये जनतेची भूमिका महत्त्वाची आहे. गेली १० वर्ष जी माणसं आमच्यापाठी ठाम राहिली. त्यांना त्रास झाला. विकास कामांऐवजी अन्याय खूप झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी हा निर्णय घेतला आहे”, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.