विधानसभेपूर्वी मोठी बातमी, निलेश राणे हाती बांधणार शिवबंधन, म्हणाले “वडिलांनी ज्या चिन्हावर…”

| Updated on: Oct 22, 2024 | 1:21 PM

उद्या (23 ऑक्टोबर) संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिंदे गटात प्रवेश करतील. निलेश राणे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली.

विधानसभेपूर्वी मोठी बातमी, निलेश राणे हाती बांधणार शिवबंधन, म्हणाले वडिलांनी ज्या चिन्हावर…
निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करणार
Follow us on

Nilesh Rane On Shivsena Shinde Group : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या (23 ऑक्टोबर) संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिंदे गटात प्रवेश करतील. निलेश राणे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. “नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली, त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार” असल्याचे निलेश राणे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. आज निलेश राणे यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. “मी २०१९ ला नारायण राणे साहेबांसोबत भाजपमध्ये आलो. इथे खूप सन्मान मिळाला. अनेक नेत्यांनी आदर दिला. प्रेम दिलं. इथे शिस्त पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी लहान भावाप्रमाणे सांभाळलं. रवींद्र चव्हाण यांनी ही लहान भावाप्रमाणे वागणूक दिली. सगळ्याच नेत्यांनी चांगली वागणूक दिली”, असे निलेश राणे म्हणाले.

“बाळासाहेब ठाकरे हे कायम दैवत”

“आताची निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जात आहोत. त्यामुळे नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली, त्याच चिन्हावर आता मी निवडणूक लढवणार आहे. पक्षाच्या हितासाठी मला जे करता येईल ते मी करेन”, असे निलेश राणेंनी म्हटले. त्यापुढे निलेश राणेंनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे माझे कायम दैवत आहेत, ते कायम दैवत राहतील, असेही म्हटले.

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

“मी कुणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही तर विकास करण्यासाठी निवडणूक लढणार आहे. निलेश राणे उद्याचा केव्हाही विचार करत नाही. मी जसा आहे, तसा आहे. उद्या भरगच्च कार्यक्रम होणार आहे. प्रेमापोटी ज्यांना ज्यांना यायचं आहे ते येतील. कुडाळमध्ये मोठा कार्यक्रम घेणार आहे. मी लहान कार्यकर्ता आहे. मला निवडणूक लढायची आहे”, असे निलेश राणे म्हणाले.

दरम्यान निलेश राणे हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. निलेश राणे हे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या संध्याकाळी ४ वाजता निलेश राणेंचा पक्षप्रवेश होणार आहे.