मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. (Pankaja munde tested Corona positive)
पंकजा मुंडे यांचे ट्वीट
माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.
I m tested Corona positive…I m already Isolated taking precautions.. I met so many people n families of Corona victims I must have caught there ..those who were with me plz get ur tests done..take care ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 29, 2021
दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजप खासदार प्रितम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली होती. बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन मुंबईला परतल्यावर त्यांना त्रास जाणवायला लागला. त्यांनी आपली RTPCR कोरोना चाचणी केली होती. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्या घरीच विलगीकरणात थांबल्या होत्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणखी काही टेस्ट करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली होती.
“मागील आठवड्यात 14 ते 18 एप्रिल या काळात संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मी प्रत्येक कोविड सेंटरला भेट दिली. तेथे रुग्णांची आणि डॉक्टरांची विचारपूस केली. प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. त्यांना योग्य ती कारवाई करायला भाग पाडलं. या माध्यमातून मी आपलं कर्तव्यच पार पाडतेय. हे काम करुन मी पुन्हा 18 एप्रिलला मुंबईला आले. त्यानंतर 2-3 दिवसांनी मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा अशी लक्षणं जाणवायला लागली. मी 21 एप्रिल रोजी RTPCR चाचणी केली. त्यात कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय.” अशी माहिती प्रितम मुंडे यांनी व्हिडीओद्वारे दिली होती.
धनंजय मुंडेंची भावनिक प्रार्थना
यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली त्यांनी एक भावनिक ट्विट केलं होतं. “बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बऱ्या व्हाल, ही खात्री व सदिच्छा व्यक्त करतो,” असे धनंजय मुंडे यांनी आल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. (Pankaja munde tested Corona positive)
संबंधित बातम्या :
बहीण प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं, भाऊ धनंजय मुंडेंची भावनिक प्रार्थना म्हणाले…
सर्दी, खोकला आणि ताप, कोरोनाची लक्षणे, पण RTPCR चा रिपोर्ट निगेटिव्ह, खासदार प्रीतम मुंडे क्वारंटाईन