‘आम्हाला जातीय सलोखा राखायचा, पण काहींना राजकीय पोळी भाजायची’, प्रवीण दरेकर यांचा शरद पवारांना टोला

| Updated on: Jul 29, 2024 | 7:19 PM

प्रवीण दरेकर यांनी राज्यातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी आज मणिपूरच्या घटनेचा उल्लेख करत महाराष्ट्राच्या बाबतीत चिंता व्यक्त केली. त्यांच्या संबंधित वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी टीका केली.

आम्हाला जातीय सलोखा राखायचा, पण काहींना राजकीय पोळी भाजायची, प्रवीण दरेकर यांचा शरद पवारांना टोला
शरद पवार आणि प्रवीण दरेकर
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्याच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना मणिपूरचा घटनेचा उल्लेख करत चिंता व्यक्त केली. शरद पवार यांनी मणिपूरचा उल्लेख करणंच सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागलं आहे. याआधी शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्यावर या मुद्द्यावरुन निशाणा साधला. त्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी निशाणा साधला आहे. “सरकारची स्पष्ट भूमिका आहे की, जातीय वादावरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये. ओबीसी समाजाला, मराठा समाजाला न्याय देणं ही आमची भूमिका आहे. आम्हाला राज्यात जातीय सलोखा राखायचा आहे. पण काहींना राजकीय पोळी भाजायची आहे. निवडणुकीत राजकीय पोळी भाजण्याच्या हेतूने काही लोक वागत आहेत”, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

“अशा प्रकारचं संघर्षाचं वातावरण महाराष्ट्रात असताना शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने मणिपूरच्या घटनेचा संदर्भ देणं योग्य आहे, असं मला वाटत नाही. कारण महाराष्ट्रात शांतता राहिली पाहिजे, ही भूमिका सत्ताधाऱ्यांसोबत सगळ्यांचीच असली पाहिजे. अशाप्रकारे मोठं वक्तव्य करणं हे योग्य नाही. केवळ चिंता व्यक्त करून चालणार नाही तर मणिपूरच्या घटना घडू नयेत यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर बोललं पाहिजे. शरद पवार या राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सरकार आलेली आहेत. त्यांनी हा विषय लांबून केवळ न पाहता सरकारसोबत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नामा निराळं राहणं योग्य नाही”, अशा शब्दांत प्रवीण दरेकर यांनी सुनावलं आहे.

प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर टीका

“मराठा समाजाचे संघटक आज उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले होते. तिथे जावून त्यांनी उद्धव ठाकरे यांना जाब विचारला. आमचंही हेच म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी, शरद पवारांनी आणि काँग्रेसने आपली मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका लवकरात लवकर जाहीर करणं गरजेचं आहे. केवळ बोटचेपी भूमिका घेणं योग्य नाही”, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

‘राज ठाकरे आणि आमची भूमिका एकच’

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आणि आमची भूमिका एकच आहे. खोचक टीका करणं हे राज ठाकरेंचं काम आहे. प्रशासकीय यंत्रणेने पुण्यात नीट काम केलं नाही, हे स्पष्ट दिसतंय. तिथे आता बऱ्याच गोष्टी नियंत्रणात आल्या आहेत. कोल्हापूर आणि सांगलीत एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या धर्तीवर तिथे यंत्रणा सज्ज आहे. अशी पूर परिस्थिती येते तेव्हा ठाणे पुण्यातून सुसज्ज यंत्रणा जाते”, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

‘सन्मानजनक जागावाटप होईल’

“जातीय जनगणना हा केंद्रस्तरावरचा विषय आहे. याबद्दल केंद्रीय मंत्री आपली भूमिका मांडतील किंवा मुख्यमंत्री स्तरावरचा हा विषय आहे. ते योग्य तो नक्कीच निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली. तसेच “विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षासाठी योग्य तो सन्मानजनक जागावाटप होईल”, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.