शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. विधानसभा निवडणुकीत गुंडांच्या टोळ्या सक्रिय म्हणत त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला होता. दरम्यान त्यानंतर आता संजय राऊत यांच्या या टीकेवर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी जोरदार पलटवार केला आहे. ‘सकाळी उठल्यावर नऊ वाजता संजय राऊत यांना बाग द्यावा लागतो, तो जर दिला नाही तर त्यांना संध्याकाळी भाकर भेटत नाही’ असा टोला दानवे यांनी लगावलाय आहे. ते काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही, असंही यावेळी दानवे यांनी म्हटलं आहे, ते शेवगावमध्ये बोलत होते.
दरम्यान बटेंगे तो कंटेंगे असा प्रचार करत भाजपने समाजा-समाजात तेढ निर्माण करू नये असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्याला देखील दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेच जाती-जातीत तेढ निर्माण करून, मतं मिळवण्याचे काम केले आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे धोरण जर कुणी वापरलं असेल तर ते पंतप्रधान मोदींनी वापरलं असं दानवे यांनी म्हटलं आहे.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्राचारार्थ शेवगाव येथे प्रचार सभा घेण्यात आली, त्यावेळी दानवे बोलत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील या सभेला उपस्थिती होती. सभेनंतर माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी म्हटलं की या विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला खुप चांगले वातावरण आहे. तसेच लोकसभेत जे वातावरण होते त्याच्या विपरित वातावरण असून याचा महायुतीला चांगला फायदा होईल. महायुतीच्या 185 जागा निवडून येतील असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. आता संजय राऊत हे दानवे यांच्या टीकेला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.