आदित्य ठाकरेंना टफ फाईट? आधी अमित ठाकरे अन् आता भाजपची महिला नेता वरळीच्या मैदानात?

| Updated on: Oct 17, 2024 | 11:46 AM

वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपच्या एका महिला नेत्यानेही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक आदित्य ठाकरेंना कठीण जाणार असल्याचे बोललं जात आहे.

आदित्य ठाकरेंना टफ फाईट? आधी अमित ठाकरे अन् आता भाजपची महिला नेता वरळीच्या मैदानात?
आधी अमित ठाकरे अन् आता भाजपची महिला नेता वरळीच्या मैदानात?
Follow us on

Worli Assembly Constituency : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. मुंबईतील हायव्होलटेज मतदारसंघ अशी ओळख असलेल्या वरळी मतदारसंघाकडे यंदा सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. पण आता भाजपमधील एका महिला नेत्याने वरळीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. 2019 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी या मतदारसंघातून मोठा विजय मिळवला होता. मात्र शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाचा या भागात कमी दबदबा झाला आहे. त्यातच आता येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत वरळीतून महायुतीसह मनसेनेही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपच्या एका महिला नेत्यानेही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक आदित्य ठाकरेंना कठीण जाणार असल्याचे बोललं जात आहे.

आदित्य ठाकरे विरुद्ध शनाया एनसी अशी लढत होणार?

भाजप नेत्या शनाया एनसी यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. मला आदित्य ठाकरेंविरुद्ध निवडणुकीला उभे राहायचे आहे, अशी इच्छा शनाया एनसी यांनी व्यक्त केली आहे. शनाया एनसी यांच्या या इच्छेवर भाजप नेते काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. जर भाजपने शनाया एनसी यांना वरळीतून तिकीट दिले तर वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे विरुद्ध शनाया एनसी अशी लढत होण्याची शक्यता आहे.

मनसेकडून अमित ठाकरेंना उमेदवारी?

तर दुसरीकडे वरळी विधानसभा मतदारसंघातून मनसेनेही चाचपणी सुरु केली आहे. मनसेकडून अमित ठाकरे हे वरळीतून विधानसभा लढवणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आहेत, तसेच आदित्य ठाकरेंचे चुलत भाऊ देखील आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे मताधिक्य काहीसं कमी झालं आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. त्यामुळे जर महायुती आणि मनसेने वरळी मतदारसंघात उमेदवार दिला तर आदित्य ठाकरेंसाठी यंदाची निवडणूक अवघड ठरणार आहे.