नागपूर: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल झालेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे. संजय राठोड हे कुठे गेलेत, हे मी सांगू शकत नाही. ते वनमंत्री आहेत, ते दाट वन शोधत संशोधन करत असतील, अशी खोचक टिप्पणी मुनगंटीवार यांनी केली. (BJP leader Sudhir Mungantiwar taunts Sanjay Rathod)
ते गुरुवारी नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यपाल आणि महाविकासआघाडी सरकारमधील संघर्षावरही भाष्य केले. सरकारला विचारणा करण्याचा हक्क घटनेने राज्यपालांना दिला आहे. त्यामुळेच त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात सरकारला विचारणा केली, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.
मात्र, हे पहिले सरकार आहे जे सांगते की, आमचे राज्यपालांसोबत खुले युद्ध आहे. हे सर्वकाही स्वार्थासाठी सुरु आहे. 12 आमदारांच्या निवडीवरुन आम्ही कोर्टात जाऊ, असे सरकार सांगते. मात्र, सरकारमध्ये तेवढी धमक नाही, अशी टीका सुधार मुनगंटीवार यांनी सांगितले.
गेल्या 10 दिवसांपासून संजय राठोड अज्ञातवासात आहेत. पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या करुन आता 10 दिवस उलटले आहेत. मात्र, या काळात संजय राठोड एकदाही प्रसारमाध्यमांसमोर आले नाहीत. केवळ त्यांच्या कथित संभाषणाच्या क्लीप्स आणि याप्रकरणातील एकाहून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
संजय राठोड गुरुवारी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असे सुरुवातीला सांगितले होते. मात्र, पोहरादेवी दौरा लांबणीवर पडल्याची माहिती बुधवारी समोर आली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी दोन दिवसांपूर्वीच मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवून दिला आहे. मात्र, संजय राठोड हे विदर्भाती शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्यापाठी बंजारा समाजाचा मोठा जनाधार आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्त्वाने अद्याप त्यांच्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी अरुण राठोड याला बुधवारी रात्री ताब्यात घेतले. पुणे आयुक्तालयात त्याची चौकशी केली जाणार आहे. अरुण राठोड हा पूजा चव्हाण प्रकरणातील महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे आता त्याच्या चौकशीत आणखी काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या:
पूजा अरुण राठोड कोण?, मेडिकल रिपोर्ट काय सांगतो?, नांदेडशी कनेक्शन काय?; वाचा सविस्तर रिपोर्ट!
(BJP leader Sudhir Mangutiwar taunts Sanjay Rathod)