आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरच्या कागलमध्ये भाजपला मोठा झटका दिलाय. कारण भाजपचे कागलचे नेते समरजित घाटगे यांना आपल्या पक्षात वळवण्यात शरद पवार गटाला यश मिळताना दिसतंय. त्यामुळे भाजपकडून शरद पवार गटाला पोखरण्याचं काम सुरु झालं आहे. भाजप शरद पवार गटाकडून कागलचा वचपा काढणार का? ते आगामी काळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण सांगलीत आज मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी सांगतील शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची भेट घेतली आहे.
भाजपाचे नेते तथा माजी मंत्री विनोद तावडे यांनी सांगलीच्या शिराळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली आहे. विनोद तावडे यांनी शिराळा येथे शिवाजीराव नाईक यांच्या घरी जाऊन ही भेट घेतली आहे. या भेटीमध्ये राजकीय खलबते झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काही वर्षांपूर्वीच माजी मंत्री आणि शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी आज शिवाजीराव नाईक यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरी जाऊन घेतलेली भेटीमुळे तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवाजीराव नाईक हे भाजपाच्या वाटेवर तर नाहीत ना? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.