आरक्षणविरोधी विधानानंतर भाजप आक्रमक, आज राज्यभरात राहुल गांधींविरोधात आंदोलन

| Updated on: Sep 13, 2024 | 8:00 AM

काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपतर्फ आंदोलन करण्यात येणार आहे.

आरक्षणविरोधी विधानानंतर भाजप आक्रमक, आज राज्यभरात राहुल गांधींविरोधात आंदोलन
Follow us on

काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपतर्फ आंदोलन करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अकोल्यात तर आशिष शेलार आणि पंकजा मुंडे हे मुंबईत आंदोलन करणार आहेत. तसेच पुण्यात भाजपच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार हे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी 12 वाजता आंदोलन होईल.

काँग्रेसचेही आंदोलन

तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षातर्फेही आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनाला प्रत्युतर म्हणून काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात येणार आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी ?

भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करु, असं राहुल गांधी म्हणाले. अमेरिकेतून राहुल गांधींनी आरक्षणावरुन हे वक्तव्य केलं, मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून देशात आता रान पेटलं आहे. सत्ताधारी पक्षाने त्यांना यावरून घेरण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना, राहुल गांधींनी आरक्षणावरुन भाष्य केलं. पण त्याचवेळी पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार केला जाईल हेही राहुल गांधी म्हणाले. विशेष म्हणजे, 4 महिन्यांआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संविधानाची प्रत दाखवून राहुल गांधी, मोदींवर आरक्षण संपवतील असा आरोप करत होते.

पण आता आरक्षण संपवण्याच्या वक्तव्यावरुन आता भाजपचे अनेक नेते,फडणवीस, शिंदेही राहुल गांधी यांच्यावर तुटून पडले आहेत. आरक्षण विरोधी काँग्रेसचा चेहरा समोर आला असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मतांसाठी आरक्षणावरुन कसा खोटा नॅरेटिव्ह केला हे राहुल गांधींच्या वक्तव्यातून दिसलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तर काल भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर टीका केली. लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची खरी आणि संविधान विरोधी भूमिका राहुल गांधींच्या तोंडून आता समोर आली आहे, असे टीकास्त्र लाड यांनी सोडले.

एकंदरच राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील वक्तव्यारून मोठा वाद होण्याची शक्यता असून आज राज्यभरातील आंदोलनाद्वारे भाजप त्यांच्याविरोधात रान उठवण्याची शक्यता आहे.