राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. यंदांची निवडणूक महाविकास आघाडीविरोधात महायुती अशीच रंगणार आहे. मात्र भाजपनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांच्यासोबत आम्ही निवडणूक लढलो नाही तर त्यांचा व्यक्तिगत वाद झाल्यानं त्यांनीच आम्हाला पाठिंबा दिला, असं दानवे यांनी म्हटलं आहे. दरम्यान राजकारणातील बदलती परिस्थीत पाहाता आम्ही काँग्रेस सोडून इतर घटक पक्षांना सोबत घेऊ शकतो असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
दानवे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील यावेळी जोरदार हल्लाबोल केला. 2019 ला विधानसभा निवडणूक झाल्या. आम्ही कामाच्या जोरावर जनतेला कौल मागितला. जनतेने भाजप शिवसेना पक्षाला बहुमत दिलं. मात्र जनमताचा आदर त्यांनी केला नाही. बाळासाहेबांचं ज्या विचारांशी कधीही जमलं नाही त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे गेले. राज्यात आता भाजप शिवसेनेचं सरकार येणार आहे, असं दानवे यांनी म्हटलं आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते दुसऱ्यावर आरोप करतात असा टोलाही यावेळी दानवे यांनी लगावला आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून अचानक माघार घेतली. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना रजकारणात हस्तक्षेप करायचा नसेल म्हणून त्यांनी माघार घेतली. त्यांच्या निर्णय त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. आम्ही देखील म्हणतो काँग्रेस, ठाकरे यांना पाडायचं आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. लोकसभेचं वातावरण आता नाही. राज्य आणि केंद्र सरकारच्या निर्णयाकडे बघितलं तर त्यांनी जनतेला दिलासा देण्याचं काम केलं आहे. सरकारबद्दल लोकांच्या मनात सहानभुती आहे. आता जरांगे पाटील यांनी माघार घेतल्यामुळे कोणाला फायदा झाला हे विधानसभेच्या निवडणुकीनंतरच कळेल असं रावसाहेब दानवे यांनी यावेळी म्हटलं आहे.