पीएम मोदींचे हे दोन खास शिलेदार ठरवणार महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री; काउंटडाउन सुरू, गुजरातशी आहे खास कनेक्शन

| Updated on: Dec 02, 2024 | 5:13 PM

नव्या सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. घडामोडींना वेग आला आहे.

पीएम मोदींचे हे दोन खास शिलेदार ठरवणार महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री; काउंटडाउन सुरू, गुजरातशी आहे खास कनेक्शन
PM Modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला आहे, मात्र अजूनही नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. येत्या पाच तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मात्र अजूनही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या आमदारांनी आपल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केली आहे. मात्र दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड अद्याप बाकी आहे. पाच तारखेला नव्या सरकारचा शपथविधी आहे, त्यापूर्वी चार डिसेंबरला भाजपकडून गटनेत्याची निवड केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पक्षाचा विधिमंडळ गटनेता निवडीसाठी भाजपच्या नेतृत्वाकडून दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपकडून विधिमंडळ गटनेता निवडीसाठी निरीक्ष म्हणून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची निवड करण्यात आली आहे. विजय रुपाणी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांच्याकडे पंजाबचा देखील प्रभाव आहे. तर निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी देखील अनेकदा सीतारामन यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपावली आहे. दरम्यान आता निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांच्यावर गटनेता निवडण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे उद्या संध्याकाळी महाराष्ट्रात येणार आहेत. चार तारखेला भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडला जाणार आहे. त्यानंतर पाच तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे.

नव्या सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. तब्बल 22 राज्यातील मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. लाडक्या बहिणींना देखील विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे.