ठाणे | 8 ऑगस्ट 2023 : मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांचा भडकलेला आणखी एक व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये त्या एका नाट्यगृहातील पालिका कर्मचाऱ्यावर भडकताना दिसत आहेत. या घटनेपूर्वी आमदार गीता जैन यांनी मनपा कंत्राटी अभियंता शुभम पाटील यांना जाहीरपणे झापड मारल्याचा व्हिडिओ खूप चर्चेत आला होता. आमदार गीता जैन यांच्याकडून वारंवार मराठीचा अपमान केला जात असून हे सहन करणार नाही असा इशारा शिवसेना आमदाराने दिला आहे.
काशीमिरा येथील भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात सुमिरन मंडळाच्या हिंदी नाटक खाटू श्यामजी या कार्यक्रमासाठी सायंकाळी साडे पाच वाजताचे बुकिंग होते. पण, त्याच दिवशी मराठी नाटक “करुन गेला गांव” या नाटकची दुपारची बुकींग घेण्यात आली होती.
मराठी नाटकादरम्यान काही तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे नाटक उशिरा 6 वाजून 10 मिनिटांनी संपले. याचा राग आल्याने आमदार गीता जैन यांनी थिएटरचे बुकिंग घेणारे कर्मचा्रयावर चांगल्याच संतापल्या होत्या. मात्र, यावरून आता मनसे आणि शिंदे गटाचे ठाण्यातील आमदार चांगलेच संतापले आहेत.
मराठी नाटक करून गेला गावी उशिराने संपल्यामुळे आमदार गीता जैन यांना संताप आला. थिएटरच्या पालिका बुकिंग कर्मचार्यांवर संतापल्या हे बरोबर नाही. वारंवार गीता जैन यांच्याकडून मराठी आणि मराठी माणसांचा अपमान केला जात आहे हे आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. तसेच, मनसेनेही याचा निषेध केला आहे.
आमदार गीता जैन यांनी काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदर मनपा कंत्राटी अभियंता शुभम पाटील यांना जाहीरपणे झापड मारल्याचा व्हिडिओ खूप चर्चेत आला. आता पुन्हा पालिका कर्मचाऱ्यावर भडकल्याचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. लोकप्रतिनिधी असताना सहनशीलता असणं गरजेचं आहे. जर लोकप्रतिनिधी अशा प्रकारची वागणूक करू लागले तर सामान्य माणसांनी त्यांच्याकडूल काय अपेक्षा ठेवायची असा सवाल प्रताप सरनाईक यांनी केला.
दरम्यान, मी मराठी नाटक किंवा मराठी माणसाचा अपमान केला नाही, जाणून बुजून भाषा वाद करण्यात येत आहे. अधिकारी भांडण लावण्याचे प्रयत्न करत आहेत. एकाच दिवशी दोन्ही नाटकाचे बुकिंग का घेतले. जर तिथे काही घडलं असतं तर जबाबदार कोण राहिलं असतं असा जाब पालिका अधिकाऱ्याला विचारला असे आमदार गीता जैन यांनी म्हटलंय.