नाशिक : भारतीय जनता पार्टी, मनसे आणि बाळसाहेबांची शिवसेना यांनी एकत्रित येत राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदविला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध नोंदणविण्यासाठी तिन्हीही पक्षाचे नेते भगूर येथील स्मारकाजवळ जमले होते. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे विधान केले त्याला विरोध म्हणून भगूर येथील ग्रामस्थांनी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील भगूर हे सावरकर यांचे जन्मगाव आहे. राहुल गांधी यांची संपूर्ण देशात भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्याच दरम्यान पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल पुन्हा एकदा दावा केला आहे. यामध्ये राहुल गांधी म्हणाले होते, एकीकडे देशासाठी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली” अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.
याशिवाय यापुढेही जाऊन राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या बद्दल असलेले पुरावे देखील सादर केले होते. त्यात त्यांनी म्हंटलं होतं की भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत.
सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले.
आणि आपण किती शूरवीर होतो हे सांगत होते. त्यांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांची बुलढाणा मध्ये भारत जोडो यात्रा पोहचली असून शेगावमध्ये त्यांची सभा होणार असून सावरकरांच्या मुद्द्यावर ठाम असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितलं होतं.
राहुल गांधी यांच्या विधानावरुन राज्यभर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. ठिकठिकाणी सावरकर यांच्या बद्दल यांच्या विधानावरून आंदोलन होत आहे.
सावरकर यांनी केलेला त्याग आणि देशासाठी दिलेले बलिदान हे सर्वांना ठाऊक आहे पण खासदार राहुल गांधी यांना माहिती नाही म्हणून ते काहीही बरळतात असं आंदोलनादरम्यान खासदार हेमंत गोडसे यांनी म्हंटलं आहे.