काँग्रेसचे खासदार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून देशात बराच वादंग झाला.भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलनही केले. त्याचदरम्यान शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘ जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार’ असं वक्तव्य गायकवाड यांनी केलं, त्यानंतरही बराच गदारोळ झाला. मात्र हे कमी की काय म्हणून आता भाजप खासदाराचीही जीभ घसरली आहे. ‘राहुल गांधींची जीभ छाटू नये,त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे’ असं वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे. शिंदेंच्या आमदारानंतर आता भाजप नेत्याच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल बोंडे ?
बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचx बक्षीस देणार असं वादग्रस्त विधान केलं होतं. ते ताजं असतानाच आता भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी देखील राहुल गांधी यांच्या यासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडालीय. ‘ संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाहीये. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची ‘जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे’ अशा लोकांच्या जिभेला चटके देणे आवश्यक आहे ‘ अशी टीका अनिल बोंडे यांनी केली आहे. राहुल गांधी, ज्ञानेश महाराव असो अथवा श्याम मानव असोत असे म्हणत भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी ज्ञानेश महाराव श्याम मानव यांच्यावरही टीका केली. ‘ भारतामधील बहुसंख्यांकांच्या भावना जे दुखावतात त्या लोकांना किमान जाणीव तरी करून द्यायला हवी म्हणून ‘जीभ छाटू नये तर जिभेला चटके’ मात्र निश्चितच दिले पाहिजे’ असा पुनरुच्चार डॉ. अनिल बोंडे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वादंग निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
संजय गायकवाड यांचं विधान काय होतं ?
. “जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार”, असं संजय गायकवाड म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. मात्र ‘ राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचे आहे. त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केल्याने, त्यांच्या मनातलं ओठावर आलं आहे. यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा आणि पोटातील मळमळ बाहेर आली आहे. आपण मागासवर्गीय आणि ओबीसींचे हाल पाहत आहोत. आज त्या समाजाला आपल्यासोबत आणायची गरज आहे. त्यांचे दुःख, आणि आत्मीयता यातून हे स्टेटमेंट केले’, असं स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी आपल्या वक्तव्यावर दिलं होतं.