नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर घणाघाती आरोप केले होते. सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या निकॉन प्रकल्पात पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसै वापरला गेल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमय्यांनी थेट राजधानी दिल्ली गाठून प्रेस कॉन्फरन्स घेतली. मात्र मुलाविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्या बॅक फूटवर गेल्याचं पाहायला मिळालं. 400 कोटीला मारा गोळी, तो छोटा प्रोजेक्ट आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
नील ज्या कंपनीत आहे, तो एक दोन वर्षांपूर्वी त्या कंपनीशी जोडला गेला. तो तर अगदी छोटा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला नील आणि किरीटला जेलमध्ये टाकायचंय. चला मी येतो.. खोल्या सॅनिटाईज नसतील तरी चालतील.. पोलिसात तक्रार करायला गेलो, तर तुमचे गुंड आले.. मी कागद देतोय ना, असंही किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.
दरम्यान, राऊत यांनी काल आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांना आज पत्रकारांनी सोमय्या यांना विचारले की, पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडशी तुमच्या मुलाची पार्टनरशिप आहे की नाही? पत्रकारांच्या या प्रश्नावर सोमय्यांचं आज पुन्हा तत पप झालं. त्यानंतर पुन्हा एकदा पत्रकारांनी तोच प्रश्न विचारला. यावेळी सोमय्या यांनी ही गोष्ट सावरुन नेत पीएमसी बाँकेतील घोटाळ्याशी आमचा दमडीचा संबंध नाही असं सांगितलं. सोमय्या म्हणाले की, आम्ही त्या बँकेतून एक पैसासुद्धा घेतलेला नाही. ज्या फ्रंटमॅनबद्दल राऊत बोलतायत तो कोणाचा माणूस आहे ते येत्या काही दिवसात समोर येईल. राकेश वाधवान किंवा पीएमसी घोटाळा याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. हे मी पुन्हा एकदा सांगतो. उलट पीएमसी घोटाळा मीच बाहेर काढला, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. डीएचएफल घोटाळा पण आम्हीच बाहेर काढला. तरीही तर संजय राऊत यांच्याकडे याच्याशी सबंधित डॉक्यूमेंट होते किंवा आहेत तर त्यांना ईडीने इतक्या वेळा बोलवलंय तेव्हा द्यायला हवे होते, ते आताही देऊ शकतात.
संजय राऊत यांनी कर्जतच्या जमिनीच्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.यासंदर्बात किरीट सोमय्या यांनी भाष्य केलं आहे. मी कर्जतला गेलो. तिथे चौकशी केली. श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे असून रश्मी यांचा भाऊ आहेत. ती जमीन आधी सलीमच्या नावे ट्रान्सफर झाली. हिंदू देवस्थानाची जमीन आणि मुस्लिमाच्या नावे, आणि मग पाटणकरांच्या नावावर झाली, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
श्रीधर पाटणकर हे का बोलत नाहीत. श्रीधर पाटणकर याच्या नावावर जमीन सलीम याच्या नावावरुन ट्रान्सफर झाली आहे. मी तक्रार दिलेली नाही. मी फक्त जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली, असं किरीट सोमय्या म्हणाले.
कोविड घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत एका शब्दानं बोलत नाहीत. यासंदर्भातील कागदपत्र मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे. पुण्यात कंपनी ब्लॅकलिस्ट करुन त्यांना कंत्राट देणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. मूळ मुद्दा कोविड घोटाळ्याला ठाकरे सरकार आणि संजय राऊत प्रचंड घाबरलेले आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.
निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभारले जात आहेत. पर्यावरणाच्या परवानग्या नाही, हरित लवादानं एक्शन घेतली, तर त्यावर कारवाई होईल. आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे की याची ताबडतोब चौकशी करा, नील सोमय्याला अटक करा. राऊत पुढे म्हणाले की, मुळात पीएमसी घोटाळ्यातील आरोपीनं सोमय्याच्या जवळच्या माणसाला का जमीन विकली? हा भ्रष्टाचाराशी लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय, आम्हाला अक्कल शिकवतोय. एकीकडे भ्रष्टाचारविरोधाची भजनं करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा, असा टोलाही राऊतांनी सोमय्या यांना लगावलाय. तसंच देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन आहे. त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी राऊत यांनी केलीय.
संबंधित बातम्या :