आगामी महापालिका निवडणुकांच्या पाश्वभूमीवर भाजपकडून रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. आज भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीत पार पडत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनापूर्वी भाजप खासदार नारायण राणे यांनी शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.
भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. यावरुन नारायण राणेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नारायण राणेंनी त्यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांची मानसिकता चांगली नाही. ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुम्हीही देऊ नका, अस सल्ला भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.
“संजय राऊतची मानसिकता चांगली नाही. ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुम्हीही देऊ नका. शिवसेनेची सत्ता असताना संजय राऊत कोणाकोणाला पोसत होता. कोणकोणत्या माफियांना संजय राऊत भेटत होता. कोणती तीर्थयात्रा केली म्हणून जेलचा पुरस्कार मिळाला होता. हे त्यांना आधी सांगावं. शिवसेनेत बोलायला माणूस नसल्यामुळे त्याला कामधंदा नसल्याने बोलायला लावतात”, अशा शब्दात नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केली.
त्यासोबतच नारायण राणे यांनी बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीबद्दलही भाष्य केले. “हे सरकार कोणालाही सोडणार नाही. गुन्हेगाराला तर मुळीच नाही. चौकशी करून पुरावे गोळा केले जातात आणि त्यानंतर कारवाई केली जाते. हे संजय राऊतला माहित नाही, त्यामुळे त्यांनी आधी प्रशासन जाणून घ्यावं”, असे नारायण राणे म्हणाले.
यावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. “उद्धव ठाकरे आधी दोन्ही हातवर करून बोलत असायचे. मात्र आता ते हात एकदम छोटे झाले. त्यामुळे उद्या स्वबळावर लढून काय होणार. त्यांच्या स्वबळाची ताकद राहिली नाही. 46 वर्षात साहेबांनी जे मिळवलं ते अडीच वर्षात याने गमावलं”, असा आरोप नारायण राणेंनी केला.
यावेळी त्यांना शिवसेनेसोबत युती आणि जवळीक याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “याबद्दल वरिष्ठ नेते निर्णय घेतील.
तो निर्णय आम्हाला मान्य राहील. मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे आता काही सांगू शकत नाही”, असे नारायण राणे म्हणाले.