परळी (बीड) : अठरा महिन्याच्या विश्रातीनंतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना यावर्षी पुन्हा एकदा तितक्याच ताकदीने सुरु झाला आहे. गेल्या 19 दिवसात उत्पादित झालेली साखर पाहून कारखान्याच्या अध्यक्षा तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अत्त्यानंद झाला. हा आनंद त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट जाणवत होता. ‘वैद्यनाथ’ च्या यंत्राची धडधड म्हणजे जणू लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अस्तित्वाचाच भास त्यांना यावेळी जाणवला. (BJP Pankaja Munde Visit Vaidyanath Sugar Factory)
मध्यंतरीच्या दुष्काळामुळे वैद्यनाथ कारखाना गेली अठरा महिने बंद होता. नैसर्गिक संकट आणि आर्थिक विवंचनेत कारखाना सुरु करणे तशी तारेवरची कसरत होती परंतु पंकजा मुंडे यांनी सर्व संकटावर मात करत कारखाना पुर्ववत सुरु करण्यात यश मिळवले.
गेल्या 19 दिवसांत कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा 62 हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला असून 48 हजार साखरेच्या पोत्यांचे उत्पादन केले आहे. दररोज 3 हजार 500 मेट्रिक टन ऊस गाळप करत असलेला वैद्यनाथ येत्या दोनच दिवसांत 4 हजार मेट्रिक टन क्षमतेने ऊस गाळप करणार आहे, तसे नियोजन कारखान्याने केले आहे.
पंकजा मुंडे आज दिवसभर वैद्यनाथ साखर कारखान्यावर होत्या. वैद्यनाथ आणि पानगांव कारखान्याच्या गळीत हंगामाचा अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर कारखान्यात जाऊन यंत्रणेची पाहणी केली.
कारखान्याने उत्पादित केलेली तीन प्रकारची साखर पाहून त्यांना आनंद झाला. एवढंच नव्हे तर ती साखर उपस्थित अधिकारी, कर्मचारी व संचालकांना वाटप करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. वैद्यनाथ हा लोकनेते मुंडेसाहेबांचा जीव की प्राण होता, अगदी तीच आठवण पंकजाताई मुंडे कारखान्याची पाहणी करताना उपस्थितांना आली.
(BJP Pankaja Munde Visit Vaidyanath Sugar Factory)
संबंधित बातम्या
परळीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र, पंचायत समिती सभापतीवर अविश्वास
आधी उर्मिला गित्तेंनी सभापतीपद गमावलं, नंतर पतीला अटक, परळीत तणाव