महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 या वयोगटातील महिलांना महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येत आहेत. सरकारच्या या योजनेला मोठा प्रतिसाद देखील मिळतोय. मात्र आता याच योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई रंगत असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पक्षाच्या सोशल मीडियावरुन एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाजपकडून ठाण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो आहे. मात्र या बॅनर वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला नसल्याने महायुतीत आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकंदरच महायुतीमध्ये या योजनेवरून श्रेय घेण्याची चढाओढ सुरू असलेली दिसत आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट’ या मोहिमेची आज आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातून सुरूवात करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बॅनरवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लागले आहेत. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो मात्र बॅनरवर कुठेही दिसत नाहीये, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
देवा भाऊ… भाजपच्या बॅनरचीच चर्चा
भाजपची ही बॅनरबाजी मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावरच भाजपकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘ देवा भाऊ… #लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला!’ असा उल्लेख असलेले मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बॅनरवर देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री या सर्वांचाच फोटो आहे. मात्र उपमुख्यमंत्र्याचा फोटो काय, साधा उल्लेखही त्या बॅनरवर नसल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे.
अजित पवारांच्या जाहिरातीवरून झाला होता गदारोळ
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, राज्यात चांगलीच हिट ठरली असून राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र ते पाहून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये या योजनेचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून या योजनेचे श्रेय घेण्याचा पुरेपूर प्रयत्न होताना दिसला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात पक्षाच्या सोशल मीडियावरुन नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
यामध्ये ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वगळून ‘दादाचा वादा’ अशी टॅगलाईन वापरत लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यात आला. ज्यांच्या नावाने ही योजना आहे, या मुख्यमंत्र्याचे नावच तेथून काढून टाकल्याने महायुतीचं वातावरण चांगलंच तापलं होतं. तसेच ‘अजित पवारांची लाडकी बहीण योजना’ असा उल्लेखही जाणीवपूर्वक जाहिरातीमध्ये करण्यात आला. महायुतीच्या सर्व नेत्यांचा उल्लेखही त्यातून वगळण्यात आला. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला. तसेच या योजनेसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी आणि महिलांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले
त्यामुळे खळबळ माजली होती. महायुतीच्या नेत्यांना वगळून अजित पवार गट या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे धुसफूस माजली होती. तर आता भाजपाने ठाण्यात लावलेल्या बॅनरमधून अजित पवार यांचा फोटो, नाव सर्वच वगळण्यात आलं. त्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच जुंपल्याची चर्चा सुरू आहे.