कांदिवलीतील भाजप आणि काँग्रेसमधील वाद काही थांबताना दिसत नाहीये. भाजपने काँग्रेसच्या नेत्या अजंता यादव यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अजंता यादव यांनी कोळी समाजाचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. तर, अजंता यादव यांनी आज भाजपवर वेगळाच आरोप केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्याने माझा हात धरला आणि माझी साडीही खेचली असा आरोप अजंता यादव यांनी केला आहे. यादव यांच्या या गंभीर आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भाजपचे उमेदवार पीयूष गोयल हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यावेळी प्रचार करताना मासळी बाजारात त्यांनी नाकाला रुमाल धरला होता. त्यावरून काँग्रेसने भाजपला घेरलं होतं. हा कोळी समाजाचा अपमान असल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाले होते. हे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच मुंबई महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा आणि माजी नगरसेवक अजंता यादव यांनी भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
माझ्या वाहनावर हल्ला केला
काल भाजप कार्यकर्त्यांनी अचानक माझ्या गाडीवर हल्ला केला. माझ्यावर हल्ला केला. एका तरुण कोळी बांधवाला मारहाण केली. माझा हात धरला, माझी साडी खेचली, चष्मा फोडला, असा गंभीर आरोप अजंता यादव यांनी केला. तसेच यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्याही यावेळी उपस्थित होत्या, असा दावाही त्यांनी केला आहे.
महिलांनी तक्रार केली
काही कोळी महिला आमच्याकडे आल्या आणि म्हणाल्या की, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. आम्हाला भाजपच्या उमेदवाराला विरोध करायचा आहे. कारण काही दिवसांपूर्वी भाजपच्या उमेदवाराला माशांची दुर्गंधी सहन झाली नाही. रुमाल बांधून मासळी बाजाराजवळून गेले. यामुळे कोळी समाजाचा अपमान झाला. कोळी महिलांची ही तक्रार ऐकूनच आम्ही त्यांना पाठिंबा दिला, असं अजंता यादव म्हणाल्या.
दोन्ही पक्ष पोलीस स्टेशनमध्ये
दरम्यान, काल कांदिवली पोलीस स्टेशन बाहेर भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मनिषा चौधरी यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर कोळी समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला. कांदिवलीत काँग्रेसच्या आणि भाजपा कार्यकर्त्याचं बाचाबाचीचं प्रकरण घडलं होतं. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालर्यासमोर केलं आंदोलन केलं होतं. आंदोलनादरम्यान भाजपच्या कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली होती. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती.