चंदन पूजाधिकारी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : राष्ट्रवादीचे नेते (NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. छगन भुजबळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधनावरून भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानाच्या बाहेर भाजपच्या (BJP) युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सरस्वती देवीची प्रतिमा भेट देण्यासाठी घेऊन जात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी प्रतिमा भेट देण्यासाठी आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलीसांनी प्रवेशद्वारावरच रोखले होते. मात्र,यावेळी प्रतिमा भेट देण्यासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना छगन भुजबळ यांनी चर्चेसाठी बोलावून घेतले आहे. त्यामुळे भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि छगन भुजबळ यांच्यात वादग्रस्त वक्तव्यावरुन भुजबळांचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्म येथे चर्चा सुरू आहे.
भुजबळ यांनी काय विधान केले होते
शाळेमध्ये सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावा. कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावला पाहिजे. पण, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला सरस्वतीला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलंच नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आहे आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची ? असा सवाल उपस्थित करत भुजबळांनी हे विधान केले होते.
छगन भुजबळांच्या याच विधानावर नाशिक भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी अमित घुगे, चंद्रशेखर पंचाक्षरी, धनंजय पुजारी, राहुल कुलकर्णी, प्रवीण थाटे यांनी भुजबळ फार्मवर निदर्शने केली.
यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सरस्वतीची प्रतिमा देखील भेट देण्यासाठी आणली होती. मात्र, पोलीसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखलं होतं.
त्यानंतर भुजबळ यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावून घेतले आहे. मात्र, तत्पूर्वी भाजपने सरस्वती पूजन करत भुजबळांच्या विधानाचा निषेध नोंदविला होता.