विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा नारा दिला होता. आता भाजपाने पक्षाचा प्रचार करण्यासाठी 10 फेब्रुवारीपासून ‘गाव चलो’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात 24 तास एका गावात मुक्कामी राहून बूथ लेव्हलला भाजपाचा प्रचार करण्यात येणार आहे. भाजपाचे केंद्रीय पातळीपासून राज्यपातळीवरील नेते या अभियानात सामील होणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ‘गाव चलो’ अभियानाची घोषणा केली आहे. या मोहिमेसाठी 50 हजार प्रवासी कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. आपण स्वत: आणि या मोहिमेत सहभागी असणार असून आपल्या सोबत भाजपाचे सर्व नेते सहभागी असतील असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या ‘गाव चलो’ अभियानात सर्वांशी संवाद साधण्यात येणार आहे. मोदी की गॅरंटीचा नारा गावोगावी पोहचविला जाणार आहे. गाव चलो अभियानात बूथ प्रमुखांशी बैठक घेतली जाणार, मतदार यादीमधील लोकांशी चर्चा करणे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, नमो एपबाबत प्रचार करणे, हॅन्ड बिल वाटप करणे, संघाच्या वरिष्ठ मंडळींशी चर्चा, युवकांसाठी नमो चषकचे आयोजन करणे, सामाजिक संस्थांशी चर्चा करणे, भिंती रंगवण्याचे काम करणे असे एकूण 18 कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
उद्धव ठाकरे यांना मतदान करणे म्हणजे कॉंग्रेसला मतदान करणे आहे. उद्धव ठाकरे यांना मत देणे म्हणजे सावरकर यांचा विरोध करणाऱ्यांना कॉंग्रेसला मत देणे आहे. उद्धव ठाकरे यांना हाती भोपळा मिळणार असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. जी जनता त्यांच्यासोबत आहे त्यांना समजेल ठाकरेंना मतदान करणे म्हणजे रामचंद्रांच्या मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मतदान करणे आहे अशी टीका त्यांनी केली. मोदीची गॅरंटी म्हणजे विकासाची गॅरंटी आहे. मोदींजींची राम मंदिर करण्याची गॅरंटी होती. आता फक्त मोदीजी चालत आहेत, बाकी कुणाचीही गॅरंटी चालत नाही. उद्धव ठाकरेंची गॅरंटी लोकांना माहीती आहे, ते राहुल गांधी, उदय निधी स्टॅलिनसाठी काम करीत आहेत असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे देश राममय झाला आहे, मोदींनी जो जाहीरनामा दिला तो पूर्ण केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यसभा निवडणूकांविषयी अजून कोणतीही चर्चा झालेली नाही. तिन्ही नेत्यांनी बजेट आणि महाराष्ट्राबाबत विकासाच्या अनुषंगाने दिल्लीचा प्रवास केला. महाविकास आघाडीच्या बैठकीला कोण गेले याचे आमचे देणे घेणे नाही. आम्हाला आमची 51 टक्के मते मिळवायची आहेत असेही बावकुळे यांनी म्हटले आहे. भुजबळ यांनी कधीही भाजपात येण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही, अंजली दमानिया यांनी चुकीचा नरेटिव्ह सेट करू नये, ते कधीही भाजपमध्ये येणार नाही असेही बावणकुळे यांनी सांगितले.
भाजपाच्या ‘गाव चलो’ अभियानात देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी, आशीष शेलार, रावसाहेब दानवे पाटील, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा,सुरेश सावे, विजयकुमार गावित, विक्रांत पाटील आदी सर्व प्रमुख नेते गावात मुक्कामी राहणार आहेत.