नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही.. रविंद्र चव्हाण कोणावर संतापले ?

| Updated on: Aug 19, 2024 | 12:51 PM

रवींद्र चव्हाणांना आवर घाला , ते युती तोडण्याचं काम करत आहेत अशा शब्दांत रामदास कदम यांनी चव्हाणांवर निशाणा साधला होता. फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील कदम यांनी केली होती. मात्र त्यांच्या या टीकेमुळे रवींद्र चव्हाण भलतेच भडकले असून त्यांनीही रामदास कदम यांना थेट सुनावलं आहे

नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही.. रविंद्र चव्हाण कोणावर संतापले ?
Follow us on

रवींद्र चव्हाणांना आवर घाला , ते युती तोडण्याचं काम करत आहेत अशा शब्दांत रामदास कदम यांनी चव्हाणांवर निशाणा साधला होता. फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील कदम यांनी केली होती. मात्र त्यांच्या या टीकेमुळे रवींद्र चव्हाण भलतेच भडकले असून त्यांनीही रामदास कदम यांना थेट सुनावलं आहे. तोंड सांभाळून बोला अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत रवींद्र चव्हणांनी त्यांना इशाराचा दिला आहे.

ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला तेव्हा रामदास कदम यांनी चव्हाण यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे भाजप मंत्र्यांना घरचाच आहेर मिळाला होता. मात्र या टीकेनंतर रवींद्र चव्हाण प्रचंड संतापले असून त्यांनी रामदास कदम यांना खडे बोल सुनावत इशारा दिला आहे.

तोंड सांभाळा नाहीतर..

बोलायला ना मलासुद्धा येतं. कधीतरी रस्त्यात समोरासमोर या.. अशा भाषेत मला बोलता येतं ना, कोणी वाचवायला देखील राहणार नाही. रवि चव्हाण आहे मी, थेट उत्तर देऊ शकतो, पण युतीधर्म पाळतोय त्याचा अर्थ असा नाही की कोणीही काहीही बोलेल आणि आम्ही ऐकून घेऊ. असं होणार नाही. एक लक्षात ठेवा, तोंड सांभाळून बोलायचं नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, ‘ अशा शब्दांत रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना इशारा दिला आहे.

रामदास कदम यांनी काय केली होती टीका ?

माझा मनात एक दुःख आहे, प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी संपला, मात्र मुंबई- गोवा या रस्त्याचा वनवास काही संपत नाही. या मार्गाची अवस्था खूप वाईट आहे. मुख्यमंत्री यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. मी नितीन गडकरी यांचीही यासंदर्भात भेट घेतली. गणेशोत्सव तोंडावर आला आहे, मात्र या रस्त्याचं काम अजूनही झालेलं नाही, असं कदम म्हणाले. नुसते पाहणी दौरे कशासाठी करायचे, त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असा ‘घरचा आहेर’ रामदास कदम यांनी युतीला दिला. शिंदे गटाच्या मेळाव्यात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना खडे बोल सुनावले.

त्यावरूनच आता वातावरण पेटलं आहे. रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावर कदम काय प्रतिक्रिया देतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन पक्षांच्या नेत्यांमधील या खदखदीमुळे नवे नाट्य निर्माण होऊ शकते. त्यामुळे महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी मात्र वाढू शकते.