मुंबई / ब्रिजभान जैस्वार : पृथ्वी शॉ याने सेल्फी देण्यास नकार दिल्याने भोजपुरी अभिनेत्री-मॉडेल सपना गिल आणि तिचे मित्र क्रिकेटपटूसोबत भिडले होते. मुंबईतील एका हॉटेलबाहेर हा वाद झाला होता. याप्रकरणी सपना गिलविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी सपना गिलने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत आपल्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या नोटीशीत मुंबई उच्च न्यायालयाने क्रिकेटर पृथ्वीशासह इतर संबंधितांना नोटीस पाठवली असून, त्यांना आपलं उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष म्हणजे सपना गिल हिने मुंबईच्या अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात पृथ्वी शॉ आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी देखील याचिका दाखल केली आहे. आता पृथ्वी शॉ न्यायालयाकडे काय उत्तर सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पृथ्वी शॉ आपल्या मित्रांसोबत 15 फेब्रुवारी रोजी मुंबईतील एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेला होता. यावेळी सपना गिलही आपल्या मित्रांसोबत तेथे उपस्थित होती. सपना आणि तिच्या मित्रांनी पृथ्वीसोबत एक सेल्फी घेतला. मात्र पुन्हा सेल्फी घेण्यासाठी आले असता पृथ्वीने नकार दिला. आपण डिनर करत असल्याचे सांगत पृथ्वीने नकार दिला.
यानंतर हॉटेलबाहेर येताच सपनाने पृथ्वीसोबत हुज्जत घातली. या भांडणाचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यानंतर पृथ्वीच्या तक्रारीवरुन ओशिवरा पोलीस ठाण्यात सपना गिलसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 17 फेब्रुवारीला सपना गिलला अटक झाली होती. आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आलाय. शॉनेच तिच्यावर आणि तिच्या मित्रांवर हल्ला केल्याचा आरोपी सपना गिलने केला आहे.