महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकासाआघाडीतील नेत्यांपुढे बंडखोरी थांबवण्याचे मोठे आव्हान पाहायला मिळत आहे. त्यातच आता भाजपला मुंबईतील पहिली बंडखोरी थांबवण्यात यश आले आहे. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी माघार घेतली आहे. भाजप नेते विनोद तावडेंनी गोपाळ शेट्टींची समजूत काढली. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्याने ते नाराज झाले होते. त्यानंतर गोपाळ शेट्टी यांना बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे तिकीट दिले जाईल, अशी चर्चा होती. मात्र भाजपने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न देता धक्कातंत्राचा अवलंब करत संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी गोपाळ शेट्टी यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर नाराज असल्याचे सांगितले होते.
यानंतर गेल्या कित्येक दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून गोपाळ शेट्टींची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु होते. काही दिवसांपूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि खासदार पियुष गोयल यांनी गोपाळ शेट्टींची भेट घेतली होती. तसेच देवेंद्र फडणवीसांनीही गोपाळ शेट्टी यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले होते. पण गोपाळ शेट्टी हे निर्णयावर ठाम होते. त्यानंतर आज सकाळपासूनच गोपाळ शेट्टी यांच्या घरी बैठक सुरु होती. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, किरीट सोमय्या, खासदार पियुष गोयल हे उपस्थित होते. या तिन्हीही वरिष्ठ नेत्यांकडून गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्यात आली. यानंतर गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.
गोपाळ शेट्टी यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “होय मी माघार घेतोय. मी आमदार बनण्यासाठी लढत नाही. मला दुसऱ्या पक्षांकडून देखील ऑफर होत्या. मात्र मला तसं करायचं नव्हतं. माझी लढाई विशिष्ट कार्यपद्धतीसाठी होती. गोपाळ शेट्टी करतोय तर करु दे, काय फरक पडतो असं आमच्या पक्षात नाही. त्यामुळे सर्व पक्षश्रेष्ठी मला भेटायला आले.”
“माझं मत श्रेष्ठींपर्यंत पोहोचलं. बाहेरचा उमेदवार आणू नये असं मी मुळीच म्हणत नाही. मात्र हे सातत्याने होत असल्याने मला हे करावं लागलं. प्रत्येकवेळी निर्णय घेणारा माणूस एकच नसतो. मी अशा कार्यकर्त्यांचं नेतृत्व करतो जे पक्षश्रेष्ठींचं ऐकतात. मी पक्ष नेतृत्वाचं ऐकतो तसं ते देखील ऐकतात. पक्ष व्यक्तीपेक्षा मोठा असतो. पक्षाकडे आपल्या भावना मांडल्या आहेत. पक्षाला समजायला वेळ लागणार नाही असं नाही. लोकांना काय वाटेल मला माहिती नाही. पक्षाच्या नेत्यांवर नाराज नाही, पण काही नेते आहेत ते असं करत असतात. नकळत होत असेल पण त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे”, असे गोपाळ शेट्टी म्हणाले.