Borivali Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यातच काल भाजपची उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. यात बोरिवली विधानसभा मतदारसंघातून मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे माजी खासदार गोपाळ शेट्टी हे नाराज झाले असून ते बंडाच्या पवित्र्यात आहेत. गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीकरांच्या सन्मानासाठी अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. आता सध्या भाजपकडून त्यांची मनधारणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्याने ते नाराज झाले होते. त्यानंतर गोपाळ शेट्टी यांना बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे तिकीट दिले जाईल, अशी चर्चा होती. मात्र भाजपने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न देता धक्कातंत्राचा अवलंब करत संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर गोपाळ शेट्टी यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर आपण नाराज असल्याचे सांगितले होते. त्यासोबतच त्यांनी बोरिवलीकरांच्या सन्मानासाठी मी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते. यानंतर मध्यरात्री मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि खासदार पियुष गोयल यांनी गोपाळ शेट्टींची भेट घेतली.
संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने बोरिवली विधानसभेमध्ये स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत. बोरिवलीत बाहेरचा उमेदवार नको, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. यानंतर आशिष शेलार आणि पियुष गोयल यांनी गोपाळ शेट्टींची भेट घेतली. त्या दोघांनी तासभर चर्चा केली. याआधी संजय उपाध्याय यांनीही गोपाळ शेट्टींची भेट घेतली. मात्र गोपाळ शेट्टी हे उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम आहेत. त्यांची नाराजी कायम आहे. गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्धार केला आहे. गोपाळ शेट्टी हे आज सकाळी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यामुळे मुंबई भाजपात पहिली बंडखोरी होणार की भाजप नाराजी दूर करण्यात यशस्वी होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
बोरिवलीतून संजय उपाध्याय यांना उमेदवारी
बोरिवली मतदारसंघात गेल्या काही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने अशाप्रकारे धक्कातंत्राचा वापर केला आहे. बोरिवलीत गेल्या विधानसभा निवडणुकीत सुनील राणे यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन भाजपचे मंत्री विनोद तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. विशेष म्हणजे विनोद तावडे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 1 लाख मतांच्या फरकाने जिंकून आले होते. पण भाजपने पुढच्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापलं होतं. यानंतर आता सुनील राणे यांचे तिकीट कापून संजय उपाध्याय यांना संधी देण्यात आली आहे.
संजय उपाध्याय यांचं मुंबईत पक्षासाठी मोठं काम आहे. त्यांचे वडील देखील कित्येक वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहेत. त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. तसेच संजय उपाध्याय हे देखील लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करत आहेत.