Buldhana Bus Accident : सिंदखेडराजा बस अपघाताला मानवी चुक जबाबदार ? प्राथमिक तपासात निष्कर्ष आला पुढे

| Updated on: Jul 01, 2023 | 8:18 PM

समोरील एक्सलच्या उजव्या बाजूस बस धडकली असल्याने बस डाव्या बाजूला उलटून रस्त्यावर एक्सल विना घासत गेल्याने जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होऊन बसने पेट घेतला असावा असे प्राथमिक तपासात आढळले आहे.

Buldhana Bus Accident : सिंदखेडराजा बस अपघाताला मानवी चुक जबाबदार ? प्राथमिक तपासात निष्कर्ष आला पुढे
buldhana bus accident
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळ शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या बसच्या अपघात टायर फुटून किंवा एक्सेल तुटून किंवा इतर तांत्रिक कारणांनी झालेला नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुमारे 25 प्रवाशांचा होरपळून बळी घेणारा हा अपघात नेमका कोणामुळे झाला ? यासाठी मानवी चुक कारणीभूत असावी का ? अशी शंका उपस्थित होत आहे. चालकाला विश्रांती मिळाली नसल्याने त्याला लागलेल्या डुलकीने तर अपघात घडला नाही ना ? असा सवाल निर्माण झाला आहे.

समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा जवळ विदर्भ ट्रॅव्हल्स या खाजगी बसला भीषण अपघात होऊन सुमारे 25 प्रवाशांचा आगीने होरपळून मृत्यू झाल्याने देशभरात दु:ख व्यक्त केले जात आहे. हा मुंबई ते नागपूर महामार्गावर याआधी देखील मोठे अपघात झाल्यामुळे या मार्गाच्या बांधकाम आणि सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, आरटीओने केलेल्या प्राथमिक तपासात या विदर्भ ट्रॅव्हल्सची बस चार ते पाच वर्षे जुनी असून तिला फिटनेस प्रमाणपत्रही मिळालेले होते. या बसची इतर कागदपत्रे देखील योग्य असल्याचे म्हटले जात आहे.

समोरचे ( दोन्ही चाकांचा मधला भाग ) एक्सल निखळल्यानंतर बसची समोरची बाजू सिमेंटच्या रस्त्यावर आदळली आणि घर्षणामुळे उष्णता निर्माण होऊन आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. ( सुमारे दिडशे किलोमीटर बसने अखंड प्रवास केल्याने इंजीन ऑईल जास्त गरम झाले असावे ) समोरील एक्सलच्या उजव्या बाजूस बस धडकली असल्याने बस डाव्या बाजूला उलटून रस्त्यावर एक्सल विना घासत गेल्याने जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होऊन बसने पेट घेतला असावा असे प्राथमिक तपासात आढळले असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

टायर फुटला नाही…

टायर फुटल्याचे कारण देखील अपघाताला जबाबदार नसल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. कारण टायर फुटल्याबाबत कुठलाही पुरावा घटनास्थळी आढळून आलेला नाही. ( उदा. टायर फुटल्यानंतर घटनास्थळी रबरचे तुकडे उडणे किंवा टायरचे रस्त्यावर उमटलेले निशाण दिसून आलेले नाही ) पुढील चाकाच्या डीस्कवर उजव्या बाजूला वाकलेले धडकेचे निशान आढळून आले आहे.

बसचा वेग हे सुध्दा कारणीभूत नाही…

बसचा वेग हे सुध्दा या अपघातामागचे कारण दिसून येत नाही. ही बस समृध्दी महामार्गावर 23.08 वाजता कारंजा लाड येथे मार्गस्थ झाली आणि अपघात रात्री 1.32 A.M. वाजता घडला. कारंजा लाड येथील इंटरचेंज पासून अपघाताचे ठिकाण 152 किलोमीटर अंतरावर आहे. याचाच अर्थ बसने 152 किलोमिटर अंतर 2 तास 24 मिनिटात पार केलेले आहे, म्हणजेच या बसचा वेग ताशी 70 किलोमीटर एवढा असावा. या बसचे योग्यताप्रमाणपत्र 10-03-2024 पर्यंत वैध होते. या सर्व बाबी विचारात घेता टायर फुटणे, एक्सल तुटणे किंवा बसच्या इतर तांत्रिक कारणांमुळे अपघात झाला नसावा असे दिसून आल्याचे प्राथमिक तपासात म्हटले आहे.