गणेश सोलंकी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, बुलढाणा | 25 नोव्हेंबर 2023 : राज्यातील सध्याचं शिंदे सरकार हे बेकायदेशीर आहे. जनतेचा या सरकारवर विश्वास नाही. आता सुरु असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणात हे लोक अपात्र होतील आणि शिंदे सरकार जाईल, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे वारंवार टीका करत आहेत. यावर बोलताना शिंदे गटातील खासदाराने जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरेंवर उद्धव ठाकरे पेक्षा संजय राऊत यांचीच छाप पडलेली आहे. त्याचमुळे आदित्य ठाकरे प्रसिद्धीत राहण्यासाठी उलट सुलट स्टेटमेंट करत असतात, असं म्हणत शिवसेना खासदार खासदार प्रतापराव जाधव यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे राजस्थान प्रचार करत आहेत. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. यावरही प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिलीय. संजय राऊत यांनी गोव्यात जाऊन ज्यांचा प्रचार केला त्यांना तीन अंकात सुद्धा मत पडली नाहीत. त्यामुळे त्यांना कुणालाही पनौती म्हणायचा अधिकार नाही. तो स्वतः च एक पनौती आहेत. ते उद्धव ठाकरेंना लागलेली पनौती आहेत. त्यांच्याचमुळे शिवसेना फुटली, असं प्रतापराव जाधव म्हणाले.
शिंदे गट आणि अजित गटातील आमदार-खासदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. त्यावर बोलताना दोन्ही पक्षांची युती मागील 30 वर्ष होती. समविचारी आणि हिंदुत्ववादी पक्ष आहेत. त्यामुळे भाजपा शिवसेना वर किंवा शिवसेना भाजपा वर निवडणूक लढवण्याचा काही विषय नाही. चिन्ह हा काही मोठा विषय नाही, असं प्रतापराव जाधव म्हणाले.
शिंदे गटातील काही लोक भाजपमध्ये जाणार, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. यावरही प्रतापराव जाधव म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी आपल्याकडे उरले सुरले खासदार त्यांनी सांभाळावेत. त्यांचेच खासदार अमोल कोल्हे हे अजित दादांना भेटले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. शिंदे गटाच्या खासदारांची त्यांनी काळजी करू नये. आम्हाला सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत, असंही प्रतापराव जाधव म्हणालेत.
राहुल गांधीनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या. त्या ठिकाणचे 90 टक्के पेक्षा जास्त उमेदवार पराभूत झालेत. नरेंद्र मोदींच्या सभा तर सोडाच पण त्यांच्या नावावर अनेक उमेदवार निवडून आले. त्यामुळे पनौती कोण आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, असं प्रतापराव जाधव म्हणालेत.