सुसाट धावणारी पल्सर बाईक झाडावर आदळली, तिघांचा मृत्यू, बुलढाणा हादरला

| Updated on: Mar 25, 2025 | 5:32 PM

महाराष्ट्रात वाढलेल्या अपघातांच्या मालिकेत बुलढाण्यात दोन भीषण अपघात घडले. पहिल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्यात एका तरुणाचा मृत्यू झाला.

सुसाट धावणारी पल्सर बाईक झाडावर आदळली, तिघांचा मृत्यू, बुलढाणा हादरला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता एका दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात हा अपघात झाला आहे. रोहित चाबुकस्वार, शुभम चाबुकस्वार, सोनू उसरे असे मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे.

झाडावर बाईक आदळल्याने मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली ते जाफराबाद रस्त्यावरील पळसखेड दौलत गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या पल्सर गाडीचा अपघात झाला आहे. या पल्सर गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी झाडावर आदळली. या दुर्घटनेत गाडीवरील तिघेही युवक जागीच ठार झाले. हे तिघेही तरुण सिल्लोड तालुक्यातील पिंपरीतील रहिवासी आहेत. रोहित चाबुकस्वार, शुभम चाबुकस्वार, सोनू उसरे अशी या तिघांची नावे आहेत. या तिन्ही तरुणांचे वय साधारण २५ च्या आसपास असल्याचे बोललं जात आहे. हे तीन तरुण कुंभारी या ठिकाणी जात असताना हा अपघात घडला.

कार आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

तर दुसरीकडे बुलढाण्यात कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. एका लग्नसमारंभातून परत येत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा शेंदुर्जन येथील एका युवकाचा रिसोड जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. माधव दिगंबर नालेगावकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

माधव दिगंबर नालेगावकर हा २२ वर्षीय युवक रिसोड येथे आपल्या एका नातेवाईकाच्या लग्न समारंभात गेला होता. तो त्याच्या दुचाकीने लग्न समारंभाच्या ठिकाणी आला होता. लग्नसमारंभात आनंद साजरा केल्यानंतर तो घरी येण्यासाठी निघाला. आपल्या दुचाकीने परत येत असताना विठ्ठल आळसा फाट्यावर समोरासमोर मोटरसायकल आणि एक चार चाकी वाहनाची जबर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीचा चक्काचूर झाला. या धडकेत दुचाकीस्वार माधव नालेगावकर हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने अकोला येथे रेफर करण्यात आले. परंतु, अकोला येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.