बुलढाणा : जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात बारावीचा पेपर फुटला. आता शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. या पेपर फूट प्रकरणी माध्यमांना प्रतिक्रिया देणं केंद्र संचालकला भोवणार असल्याचे समजते. ज्या केंद्र संचालकांनी व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर गणिताचा पेपर दाखवला त्याच्यावर कारवाई प्रस्तावित करत असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी बुलढाणा शहरातील एका केंद्र संचालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. केंद्र संचालकांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना परीक्षा सुरू असताना आणि परीक्षा काळात कॅमेऱ्यासमोर मूळ प्रश्नपत्रिका दाखवली. त्यामुळे परीक्षा गोपनियतेच्या नियमांचा भंग झाल्याचा केंद्र संचलकांवर आरोप ठेवण्यात आला. तसा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवत असल्याचे बुलढाणा जिल्हा शिक्षण अधिकारी प्रकाश मुकुंद यांनी सांगितले.
सिंदखेडराजा तालुक्यातील चारही परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक तसेच प्रश्नपत्रिका रनर बदलले. शिक्षण मंडळाच्या आदेशाने परीक्षा केंद्राचे परीक्षा संचालक तसेच रनर बदलण्यात आल्याची माहिती आहे. काल बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात बारावी गणिताचा पेपर फुटल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. पोलीस त्याचा शोधसुद्धा घेत आहेत. शिक्षण मंडळाने आता परीक्षा केंद्राचे संचालक आणि रनर बदलले असल्याची माहिती आहे.
बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणित विषयाचा पेपर निर्धारित वेळेच्या अर्ध्या तासापूर्वीच बाहेर आहे. राजेगाव परीक्षा केंद्रावरून हा पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची शिक्षण विभागाकडून गंभीर देखील घेऊन सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. राजेगाव हे साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा साखरखेर्डा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.
विभागीय परीक्षा मंडळाचे सहसचिव आणि शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी परीक्षा वितरण केंद्र सह तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांचे संचालक बदलले. विभागीय परीक्षा मंडळाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून तूर्तास विद्यापीठ, परीक्षा मंडळ गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम १९८२ च्या कलम ५ व ६ नुसार अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.