गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana) शहरा जवळच्या कोलवड (kolvad) येथे एका शेतातील घराला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झालंय. काल सायंकाळी ही घडली असून ज्यांनी ही आग पाहिली आहे. त्यांना मोठा धक्का बसला आहे. कोलवड येथील झोपडपट्टीच्या मागे शेतकरी धोंडूबा गायकवाड (farmer) यांचे शेत असून, या शेतामध्येच त्यांनी घर बांधलेले आहे. विशेष म्हणजे आपल्या परिवारासह ते तेथेच राहतात. या शेतातील घराला काल सायंकाळी अचानक भीषण आग लागली. सुदैवाने आग लागली त्यावेळेस घरात कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली.
मात्र, ही आग एवढी भीषण होती, की या आगीमध्ये टिन पत्र्याचे संपूर्ण घर, घरातील टीव्ही, अलमारी, दोन इलेक्ट्रिक मोटारी, ठिबक संच, दोन पलंग तसेच घरातील भांडीकुंडी सह इतर साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत शेतकरी धोंडूबा गायकवाड यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ही आग कशामुळे लागली हे अद्यापही समोर आले नाही. शेतकरी गायकवाड यांचा संसार त्यामुळे उघड्यावर आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात पळशी बुद्रुक गावात पाण्याच्या टाकीत बुडून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आर्यन नागे असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचं नाव असून त्याचे वडील आणि आजी बाजारात गेले असता तो एकटाच घरी होता. पाणी घेण्यासाठी तो पाण्याच्या टाकीवर चढला आणि पाय घसरून टाकीत पडला. दरम्यान पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने पळशी गावावर मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे मुलांच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी त्या ठिकाणाचा पंचनामा केला असून मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवला आहे.