बुलढाणा : हवामान खात्याचा अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील पीक हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी पिकाची मोठी आशा होती. परंतु गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने गहू, हरभरा हे पीक हातून निघून गेले. आता झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, मका, ज्वारी, गहू यासह फळ पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चितोडा येथे दुर्घटना घडली. 39 वर्षीय शेतकरी गोपाल महादेव कवळे यांच्यावर वीज पडली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत शेतकरी गोपाळ कवळे हे त्यांच्या अंबिकापूर शिवारातील शेतात कुटाराची गंजी झाकण्यासाठी गेले होते.
दरम्यान विजांचा कडकडाट सुरू होवून अंगावर वीज पडली. यात गोपाल कवळे यांचा मृत्यू झाला. याबाबत खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दुसऱ्या घटनेत, अमरावती जिल्ह्यात काल वादळी पावसासह गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलापूर गावात शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. गोपाल करपती वय वर्षे 35 अशी मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा, कौडण्यापूर गावात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आमला, लोणी टाकळी, दहिगाव गावात चक्रीवादळ आले. अनेक घरांवरील तीन पत्रे व छप्पर उडाल्याने घरातील साहित्यांचे नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे मात्र काही प्रमाणात असलेला गहू, हरभरा तसेच टरबूज,कांदा, भाजीपाल्यासह संत्रा पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.