यवतमाळ : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात यवतमाळ येथील यात जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची महिती समोर येत आहे. आमदार मदन येरावार पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात आहे. लिस्टमध्ये केवळ नाव असल्याने मृतांची ओळख पटवणे कठीण जात आहे. त्यामुळे नातेवाईक हे बुलढाणाकडे रवाना झाले आहे. समृध्दी महामार्गावर वाहनांना थांबण्यासाठी स्पॉट निश्चित करण्यात आले होते. परंतु, अजूनही स्पॉटचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे आमदार मदन येरावार यांनी सांगितले.
बुलडाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताची सखोल चौकशी करावी. या अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने 5 लाखांची सांत्वनपर मदत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2 लाखांची सांत्वनपर मदत जाहीर केली आहे. अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
हा अपघात भयंकर आणि दुःखदायक होता. समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा मृत्युचा सापळा ठरू नये, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र सर्व यंत्रणा आणि वाहनचालकांनीसुद्धा सावधानी ठेऊन पुन्हा असे अपघात होऊ नये. याची खबरदारी घ्यावी, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील अपघातग्रस्त खाजगी बस ही नागपूरवरून पुण्यासाठी निघाली. त्यानंतर अपघाताच्या काही तास अगोदर रात्री 10 वाजताच्या दरम्यान वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील न्यू राधाकृष्ण हॉटेल येथे जेवण करण्यासाठी थांबली होती. येथे काही प्रवाशांनी जेवण केलं होतं. तर कारंजा येथून दोन प्रवासी विना बुकिंग या ट्रॅव्हल्समध्ये पुण्याला जाण्यासाठी बसले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. कारंजा तालुक्यातील शिवनगर येथील मनीषा विजय बहाले आणि संजय गोविंदराव बहाळे असे प्रवाशांचे नाव असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.