गणेश उत्सव तोंडावर आला आहे. सगळीकडे भक्तीमय वातावरण असेल. गणेश बाप्पाची मूर्ती तयार करण्याचे काम सध्या कारागिरी, मूर्तीकार करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात त्यासाठी कारागिरींचा लगबग सुरु झाली आहे. काहीजण तर विविध शहरातून गणेश मूर्ती आणतात. काही जण पर्यावरण पूरक शाडूची मूर्ती तयार करतात. काही जण मातीची मूर्ती घरीच तयार करतात. पण प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती झटपट तयार होतात आणि किंमत कमी असल्याने त्यांना अधिक मागणी असते. पण ही गणेश मूर्ती साकारत असाल तर तुमच्यावर पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे.
संभाजी ब्रिगेडचा आक्षेप
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, श्री गणेश यांच्या एकत्रित मूर्त्या बाजारात आल्या आहे. हे चुकीचे असून पावसाळ्यात नद्या नाल्यांना पुर येतो त्यातील पाणी अस्वच्छ असते. त्यामुळे मूर्ती विसर्जन केल्यानंतर ते व्यवस्थित विरघळत नाही, यामुळे दरवर्षी गणेशोस्तव झाल्यावर मूर्ती विटंबनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वर व्हायरल होतात. संभाजी ब्रिगेडकडून छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतील गणेश मूर्ती बाबत आक्षेप घेण्यात आला आहे.
महापुरूषाची विटंबना नको
अनेक ठिकाणी गणेशाला विविध रुपात साकारण्यात येते. गणपती शिवरायांच्या रुपात पण बाजारात आणण्यात येतो. गणेशोत्सवाच्या अखेरीस गणपती विसर्जनाची प्रथा आहे. मात्र महापुरुष यांचे विसर्जनाची प्रथा नाही. यामुळे शिवरायांची घोर विटंबना होऊन शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जाऊन उद्रेक होऊ शकतो. यामुळे शिवरायांच्या रुपातील गणपतीला संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.
संभाजी ब्रिगेडने बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. त्यामुळे या मुर्त्या आढळून आल्यास तीव्र आंदोलन छेडू, असे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. यावर मूर्ती कलाकारांची व संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक पोलिसांनी घेतली. मूर्तीकरांना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले, तसेच लेखी सूचनापत्र सुद्धा दिले आहे. शिवरायांच्या रुपातील गणेश मूर्ती तयार केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पण देण्यात आला आहे.