बुलढाण्यात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. बुलढाण्यातील भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाने आज अचानक स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. एका आमदाराच्या अंगरक्षकाने अशाप्रकारे जीवन संपवणं हे धक्कादायक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडून याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे राज्यात पुढच्या तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. असं असताना अचानक भाजप आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केल्यामुळे बुलढाण्यात खळबळ उडाली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागे नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पण यामागील कारण राजकारण किंवा पोलीस खात्यातील वरिष्ठांकडून मिळणारी वागणूक असं काही नसून घरगुती कारण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण संबंधित पोलीस कर्मचारी हे एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे अंगरक्षक असल्याने त्यांनी अशाप्रकारे जीवन संपवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय गिरी असं या अंगरक्षकाचं नाव आहे. ते काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार श्वेता महाले यांच्या सुरक्षेसाठी दाखल झाले होते. ते श्वेता महाले यांचे अंगरक्षक म्हणून काम करत होते. ते अशाप्रकारचा टोकाचा निर्णय घेतील, असं कुणाला वाटलं देखील नव्हतं. अजय गिरी हे बुलढाण्यातील पोलीस वसाहतीत वास्तव्यास होते. ते कुटुंबासह राहत होते. या दरम्यान त्यांनी आज अचानक स्वत:चं आयुष्य संपवलं आहे.
अजय गिरी हे आज सुट्टीवर होते. त्यांनी आपल्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय गिरी यांनी वैयक्तिक आयुष्यातील अडचणींमुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. अजय गिरी यांनी त्यांच्या घरगुती कारणावरुन स्वत:चं आयुष्य संपवल्याची माहिती मिळत आहे. अजय गिरी यांनी त्यांच्या स्वत:च्या रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं आहे. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजय गिरी यांच्या निधनमुळे बुलढाण्यात पोलीस वसाहतीत शोककळा पसरली आहे. गिरी यांनी अशाप्रकारे टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कोणतंही कारण असूद्या, काहीही अडचणी असतील, तरी स्वत:चं आयुष्य संपवणं हे त्यामागील सोल्यूशन असूच शकत नाही. आपल्या अडचणी अशा पद्धतीने सुटणार नाहीत. याउलट यामुळे आपल्या कुटुंबियांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. तसेच आयुष्य हे एकदाच मिळतं. या आयुष्यात आपल्याला अनेक संधी देखील येतात. त्यामुळे आपलं आयुष्य मनसोक्तपणे जगायला हवं. आलेल्या अडचणींचा सामना करायला हवा. त्यामुळे स्वत:चं आयुष्य संपवणारं कृत्य कुणीही कधीही करु नये, असं आवाहन नेहमी केलं जातं.