यंदाची लोकसभा निवडणूक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी तुफान गाजत आहे. आता तर राजकारणात भटकती आत्मा आणि भुताटकी हा शब्द परवलीचा झाला आहे. फेक व्हिडिओवरुन पण विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आलेले आहेत. अशातच बुलडाणा मतदारसंघात एका पैजेची गोष्ट गाजत आहे. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे महायुतीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर त्यांचा पराभव व्हावा म्हणून काही जण देव पाण्यात ठेऊन बसले आहेत. काहींनी तर थेट पैजच लावली आहे. त्या पैजेची गोष्ट सध्या विदर्भाताच नाही तर महाराष्ट्रात गाजत आहे.
काय आहे ही पैज
विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे जर निवडणूक हरले तर माजी मंत्र्यांना जवळपास 10 लाखांची कमाई होणार आहे. तर विद्यमान खासदारांनी बुलडाण्याचा गड शाबूत ठेवला तर माजी मंत्र्यांना सव्वा तीन लाख रुपये मोजावे लागणार आहे. ही पैज लावली आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांनी. त्यांचा आत्मविश्वास इतका आहे की, त्यांना वाटते ही पैज ते यंदा जिंकणारच. प्रतापराव निवडणूक हरतील असा विश्वास त्यांना वाटत आहे.
अफलातून पैज
सुबोध सावजी हे आपल्या अफलातून आंदोलनासाठी ओळखले जातात. त्यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीचे जणू भाकितच केले आहे. लोकसभेच्या रिंगणात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा पराभव होण्यावर त्यांनी पैज लावली आहे. मुंबईतील एका मित्रासोबत त्यांनी ही पैज लावली आहे. ही पैज ते जिंकल्यास त्यांना 9.45 लाख रुपये मिळतील. तर ही पैज ते हरल्यास त्यांना मित्राला 3.15 लाख रुपये द्यावे लागतील.
यापूर्वीचे विधान चर्चेत
माजी मंत्री सुबोध सावजी हे त्यांच्या वक्तव्य आणि आंदोलनासाठी परिचित आहेत. यापूर्वी भाजपचे आमदार राम कदम यांच्या ‘महिलांचे अपहरण’ या वक्तव्यावरून कदम यांची जीभ तोडणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी हि दिली होती. “भिडे गुरुजींना अटक करा. अन्यथा मी त्यांचा मर्डर करेल”, अशी ती धमकी होती. यंदाच्या निवडणुकीत प्रतापरावांचा पराभव निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यासाठी मुंबईतील मित्रासोबत त्यांनी पैज लावली आहे. पैज लावल्यानंतर त्यांनी याची माहिती समाज माध्यमांवर पण जाहीर केली. बुलडाणा जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता निकालाची प्रतिक्षा आहे. 4 जून रोजी पैज कोण जिंकतो, याकडे बुलडाणावासीयांचे लक्ष लागले आहे.