प्रतिनिधी गणेश सोळंकी, बुलढाणा | 19 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे वारंवार शिंदेगटावर निशाणा साधतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीकास्त्र डागतात. त्यांच्या या टीकेला आता शिवसेना खासदाराने उत्तर दिलं आहे. संजय राऊत जे बोलतात. त्याच प्रकारचा तो माणूस आहे. ज्याचे संस्कार जसे त्याच प्रकारे शब्द आचरणात आणि उच्चारात येतात. चांगल्या संस्कारात वाढलेला माणूस कधीही चुकीचं बोलत नाही, असं म्हणत शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यांनी आमरण उपोषणही केलं. अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे यांची सभा झाली. यावरून विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनीही शिंदे सरकारला प्रश्न विचारले. यावरही प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही मराठा समजासोबत आहोत. मात्र, ज्या संजय राउतसारख्या नालायक माणसांनी मराठा क्रांती मोर्चा मधील महिलांचा अपमान केला होता. त्यावेळी विनायक राऊतची दातखिळी बसली होती का त्यावेळी मीच समोर येऊन संजय राऊतला माफी मागायला लावली होती. त्यावेळी विनायक राऊतचं मराठापण कुठं गेलं होतं? तेव्हा त्यांनी माझ्यासोबत राजीनामा का दिला नाही?, असा सवाल प्रतापराव जाधव यांनी विचारला आहे.
उद्धव ठाकरेंनी या ज्येष्ठ लोकांना त्यांची जागा दाखविली आहे. उद्धव यांनी ज्येष्ठ मंडळींना त्यांची जागा दाखवली आहे. त्यांनी नवीन नेते निवडले आणि ज्येष्ठांना बाजूला सरकवलं. त्यामुळे विनायक राऊतसह अनेक नेते नाराज आहेत. या नाराजीतूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडणार आहे, असा दावाही प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
ललित पाटील प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी लावली असून चौकशी सुरु आहे. विजय वडेट्टीवार यांनी नावानिशी पुरावे द्यावेत आणि नावानिशी आरोप करावेत. महायुतीचं सरकार त्यावर योग्य ती कारवाई करेल. मोघम आरोप करण्यात काही अर्थ नाही, असं प्रतापराव जाधव म्हणाले.