गणेश सोळंकी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, बुलढाणा | 21 ऑक्टोबर 2023 : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. ललित पाटील प्रकरणाचे धागे दोरे हे संजय राऊत यांच्यापर्यंत आहेत. त्याचा तपास केला गेला पाहिजे. संजय राऊत यांनाच बेड्या ठोकल्या पाहिजेत. याप्रकरणी संजय राऊत यांच्या घराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.
ललित पाटीलला उद्धव ठाकरे यांनीच हातावर शिवबंधन बांधलं होतं. त्याला शहर प्रमुख केलं होतं. मात्र त्याआधीही त्याच्यावर अनेक गुन्हे दखल होते. सगळं माहिती असतानाही त्याला मुद्दाम पक्षात घेतलं गेलं. या ललित पाटीलमुळे अनेक तरुण बरबाद होत होते. उद्धव ठाकरेंना हे माहिती नव्हतं का? ललित पाटीलवर गुन्हे दाखल आहेत, याची उद्धव ठाकरे यांना कल्पना नव्हती का? संजय राऊत यांनीच त्याला पक्षाचे कवचकुंडल दिलं. तेव्हा त्याच्याबद्दल तुम्हाला माहित नव्हतं का?, असा सवालही संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
दसरा मेळाव्यावरही संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरू आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा सैनिक आमच्यासोबत आहे. काँग्रेससोबत गेल्याने ठाकरे गट आता सेक्युलर झालेत. त्यांच्याकडे हिंदुत्व शिल्लक राहिलेलं नाहीये. त्यांच्यापेक्षा दुप्पटीने आमचा कार्यक्रम चांगला होईल. जसा मागच्या वेळी झाला तसाच यंदाही आमचा दसरा मेळावा पार पडेल. दसरा मेळाव्याला जाणाऱ्यांची नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे. वाहनांची व्यवस्था केलेली आहे, असं संजय गायकवाड म्हणालेत.
आगामी लोकसभा निवडणूक आणि जागावाटप यावरही संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही 22 जागा लढू. आमचे AB फॉर्म राहिलंच. त्यांचं आमच्या विचारांचं काय देणं घेणं? आमचे 19 आमदार आहेत. आम्ही 22 जागा लढलेलो आहे आणि आताही लढणार आहोत. नाहीतर आमचे एबी फॉर्म कायम ठेऊन लढू. शेवटी निर्णय एकनाथ शिंदेसाहेबांचा असेल, असं संजय गायकवाड म्हणालेत.