शरद पवार, त्यांचं राजकारण, शरद पवारांचं वय अन् त्यांची राजकीय निवृत्ती हे मुद्दे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. आताही शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांनीदेखील रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे. योग्यवेळी निवृत्तीचा विचार करायला हवा. योग्यवेळी घेतलेली निवृत्ती योग्य आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. यावरच प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांनी स्वतःच्या बाबतीत मत प्रदर्शित करायला पाहिजे होतं. शरद पवारांनी त्यांच्या निवृत्तीची योग्य वेळ अजून सांगितली नाही. अजितदादा पवार यांनी त्यांना विचारले की तुम्ही थकलेले आहात. तुम्ही निवृत्ती घेतली पाहिजे. मात्र पवार साहेबांनी स्वतःची निवृत्ती जाहीर केली नाही. दुसऱ्याच्या निवृत्तीला प्रमाणपत्र देतात.त्यांनी सुद्धा आता कधी निवृत्ती घेतात, याची घोषणा करावी. शरद पवार क्रिकेटच्या अनेक संस्थांचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांचा अभ्यास जास्त आहे. विराट आणि रोहित हे चांगले खेळाडू आहेत. त्यांचे या निर्णयामुळे अनेक चाहते नाराज झाले आहेत, असं प्रतापराव जाधव म्हणाले आहेत.
आपल्या बुलढाणा जिल्ह्यात एम आर आय सेंटर, डायलिसिस सेंटर सह कुठलीही कमतरता राहणार नाही. मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा सगळ्या सुविधा राहतील. सर्व प्रकारच्या तापसण्या आपल्या जिल्ह्यात होतील. तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाविद्यालय सुद्धा लवकर होण्यासाठी प्रयत्न करेल, असं प्रतापराव जाधव म्हणाले आहेत.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. यावरही प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाचे काम टीका करणे असते, म्हणून ते टीका करतात. सादर झालेले बजेट सर्वसामान्य लोकांसाठी आहे. अनेक योजना सह शेतकऱ्यांना वीजमाफी दिलीय. महिलांना सुद्धा मदत करण्याचे काम सरकार करत आहे, असं प्रतापराव जाधव म्हणाले.