महाराष्ट्रात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. बुलढाणा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा अवघ्या 800 मतांनी विजय झाला. मात्र हा काठावरचा विजय त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याच दिसत आहे. संजय गायकवाड यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर आरोप केले आहेत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं नाव घेत गौप्यस्फोट केला आहे. प्रतापराव जाधव यांनी माझ्याशी गद्दारी केल्याचं संजय गायकवाडांनी म्हटलं आहे. प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकर तर भाजपचे आमदार संजय कुटे यांनी अनिल परब यांना फोन करून हा सर्व कट रचल्याचा, असा गौप्यस्फोट संजय गायकवाडांनी केला आहे.
मी या निवडणुकीत एकटाच लढलो आणि कमी मतांच्या फरकाने विजयी झालो. माझ्याच पक्षातील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकर यांना फोन करून माझ्या विरुद्ध रविकांत तुपकर यांच्या ऐवजी जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्याच सांगितलं. रविकांत तुपकर यांची उमेदवारी पक्की होती. मात्र प्रतापराव जाधव यांनी फोन केल्यावर उद्धव ठाकरे यांनी उमेदवार बदलला, असा गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.
भाजपच्या संजय कुटे यांनी कट रचून अनिल परब यांना संपर्क करून माझ्या विरोधात जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली. माझ्याच विरोधात महायुती आणि माझ्या पक्षातील नेत्यांनी गद्दारी केली. याची लेखी तक्रार मी करणार आहे. विरोधी पक्षातील उमेदवाराने कोट्यावधी रुपये वाटले आहेत, असं गायकवाड म्हणालेत.
यंदाच्या निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं. यात 230 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. मुख्यमंत्रिपदाबाबत सध्या खल सुरु आहे. अशातच संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत ही आमची इच्छा आहे. शिंदे साहेब वेगळा निर्णय घेणार नाहीत, असं संजय गायकवाड म्हणालेत.