लोकसभा निवडणुकीत आमच्याकडे पक्ष नव्हता. चिन्ह नव्हतं. निवडणुकीचं चिन्हसुद्धा अगदी शेवटच्या क्षणी अर्ज भरल्यावर मिळालं. तरिही आम्ही लढलो. लोकांनी आम्हाला साथ दिली. आम्हाला यश मिळालं. दिल्लीच्या ‘अहमदशाह अब्दाली’ने आमच्यासमोर धनुष्यबाण उभे केले. लोकांचा गोंधळ व्हावा म्हणून हे सगळं केलं गेलं. तरिही आम्ही नऊ जागा जिंकलो. काही जागा आमच्या थोड्या मतांनी गेल्या. बुलढाण्याची जागा आमची थोड्या मतांनी गेली. मात्र आता विधानसभेला आम्ही सावधपणे निवडणुका लढू, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. ते बुलढाण्यात माध्यमांशी बोलत होते.
राणा दाम्पत्य नेहमीच महाराष्ट्राचा मजाक करतात. कारण त्यांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. अमरावतीत नवनीत राणा यांचा झालेला पराभव हा काही मजाक नाही. लोकांनी शहाणपणाने केलेल्या मतदानामुळेच नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. रवी राणा हे देखील पुढच्या विधानसभा निवडणुकीत दिसणार नाहीत. लाडक्या बहिणींच्या बाबतीत जर त्यांनी मजा केली असेल तर याचा अर्थ असा आहे की निवडणुकीसाठी तुम्ही केलेली ही नौटंकी आहे, असं संजय राऊत म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आम्ही दौरा करतो आहोत. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांशी बोलतोय. ग्राऊंडवरची परिस्थिती जाणून घेतोय. आता निवडणूका आहेत. त्यामुळे सगळेच पक्ष मैदानात आहेत. सगळ्यांचेच दौरे सुरु आहेत. शिवसेनाही असाच दौरा करतेय. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी ठरवलं आहे की कोणत्याही परिस्थितीत राज्यात आपल्याला सरकार आणायचं आहे. त्यासाठी आम्ही तयारीत आहोत. हे घटनाबाह्य सरकार घालवायचं असं जनतेनेच ठरवलं आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं.
नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी दिल्ली राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत घातक पायंडा पडला आहे. विरोधक हे राजकीय वैचारिक शत्रू नसून ते दुश्मन आहेत. असं समजून त्यांच्यावर हल्ले, गुन्हे आणि खटले चालवले जात आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.