गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड (sindkhed) राजा तालुक्यातील बारावी गणित पेपर (12th mathematics paper leak)फुटीच्या प्रकरणात अटक केलेल्या सात आरोपींमध्ये सहभाग असलेल्या चार शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली आहे. निलंबनाची कारवाई केलेले सर्व शिक्षक स्वयंअर्थसाह्यीत शाळांमध्ये कार्यरत होते. कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी प्रश्नपत्रिका व्हायरल करून या मास्तरांनी स्वतः च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
तर बारावी गणिताचा पेपर व्हायरल करणाऱ्यांमध्ये गजानन आडे आणि गोपाल शिंगणे हे दोघे स्वतः च्याच शिक्षण संस्थांचे संचालक असून, तेथेच शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे अ. मुनाफ हा जाकीर हुसेन उर्दू स्कूल, लोणार येथे प्राचार्य होता आणि अंकुश चव्हाण हा सेंट्रल पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत होता.
कॉपी प्रकरणात विशेष लक्ष घालणाऱ्या या चारही शिक्षकांना आता हे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे. राज्यभर हे प्रकरण गाजले, विधानसभेतही विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पेपर फुटीचे प्रकरण रेटून धरले. शासनाने तातडीने सुत्रे हलवली. प्रशासनाकडून प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्यांची शोधमोहिम सुरू केली. दरम्यान, या प्रकरणात हे चार शिक्षक आणि कॉपी पुरवण्यासाठी प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्या बाहेरच्या तीन जणांना साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास विशेष पथकाकडून करण्यात येत आहे.
बारावीचा गणिताचा पेपर फुटीचं प्रकरण राज्यात अधिक प्रसिद्ध झालं आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून रोज नवी घडामोड बाहेर पडत आहेत. आतापर्यंत अनेक शिक्षकांची चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोषी आढळणाऱ्या शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.