भावना गवळी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या दारावर 9 तास बाहेर उभ्या होत्या. त्यांना आत घ्यायचं की नाही हा एकनाथ शिंदे यांचा प्रश्न आहे. धर्म नावाची गोष्ट कोणालाही जबरदस्ती करता येत नाही. हे कलम 3 च्या 19 नुसार करता येत नाही. हे नवनीत राणा यांच्यासारख्या ढ व्यक्तीला कळणार नाही. भावना गवळी यांनी जी राखी बांधली होती. त्या राखीचा मान ठेवल्या गेली नाही. आता भावना गवळी यांच्यात भावना चांगल्याच दुखावल्या गेल्या आहेत, असं शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. त्या बुलढाण्यात टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होत्या.
आज नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या आधी महायुतीची सभा झाली. या सभेत बोलताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. महाविकास आघाडीचं सरकार हे 33 महिन्याचं सरकार होतं. तेव्हा हनुमान चालीसा म्हणतो म्हटलं म्हणून मला 14 दिवस जेलमध्ये टाकलं. हे तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना शोभलं का? असं नवनीत राणा म्हणाल्या. त्याला आता सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं.
राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरची सुनावणी पार पडली. यावर सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं. मला काहीही विषेश वाटत नाही. जे आमच्यासोबत झालंय तेच शरद पवारसाहेब यांच्यासोबत झालंय. आज दोन घटना महत्वाच्या आहेत. पवार साहेब यांच्या पक्षाचं चिन्ह जाणं तर दुसरीकडे नवणीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवणं या गोष्टी जाणू काही भाजपाला अगोदरच माहित होत्या. तरीही पवार साहेबांच्या विचारच अधिष्ठान कायम राहील. ते या निवडणुकीत यश प्राप्त करतील, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
नवनीत राणा यांना हनुमान चालीसा म्हणायची असेल तर पाकिस्तानमध्ये म्हणायची का? नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा यत्र सर्वत्र वाचावी. भारतात वाचावी. जबरदस्तीने कोणच्या घरात घुसून वाचू नये. जो तो त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे. कोणाला घरात घ्यायचं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.