गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana)येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील (Department of Public Works) एका ध्येयवेड्या अधिकाऱ्यानं गावरान आंब्याच्या झाडा खाली पडलेल्या किंवा घरातील आंबे खाल्ल्यानंतर त्या कोय जमा करून, त्यापासून गावरान आंब्याची रोप तयार केली आहेत. हा त्यांचा छंद असून मागील दहा वर्षांपासून त्यांनी तो जोपासला आहे. एव्हढेच काय हा संपूर्ण खर्च ते स्वतः च्या खिशातून करतात. तर काही त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा याला हातभार लावला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बुलढाणा (buldhana viral news) जिल्ह्यात त्यांची सगळीकडं त्यांची चर्चा असते.
बुलढाणाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपकार्यकारी अभियंता असलेले व्ही. पी. देशमुख हे मागील दहा वर्षांपासून नामशेष होत चाललेल्या गावरान आंब्याची रोपे तयार करून ते शाळा, ग्रामपंचायत, मंदिर परिसर किंवा रस्त्यावर ज्या ठिकाणी जागा असेल, त्या ठिकाणी ती रोपे लावण्यासाठी देतात. त्या पद्धतीचा त्यांनी एक फलक उप कार्यकारी अभियंता देशमुख यांनी त्यांच्या कार्यालयात लावला असून तो या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतोय.
देशमुख यांनी त्या फलकाच्या माध्यमातून आवाहन केले आहे की, ‘सध्या आंबा खाण्याचे दिवस असून आपण आंबा खाल्ल्यावर त्या कोया फेकून न देता, त्या कोया आमच्या कार्यालयात आणून द्या, किंवा आम्ही तुमच्या घरून घेऊन जाऊ, जेणेकरून गावरान आंब्याची रोपे तयार करण्यास मदत होईल’ अशा पद्धतीचा त्यांनी बॅनर लावला आहे.
दरवर्षी हे अधिकारी चार ते पाच हजार रोपे तयार करतात. यावर्षी सुद्धा त्यांनी 7 हजार रोपे ही त्यांच्या कार्यालयाच्या आवारातच तयार केली आहेत. ते स्वतः त्या रोपांची दररोज काळजी घेतात आणि आंब्याच्या कोया सुद्धा ते सुट्टीच्या काळात जमा करून आणतात. तर समाजातील इतरही लोकांना त्यांनी आवाहन केले आहे की, गावरान आंबा टिकावा यासाठी प्रयत्न करावे, आणि आंब्याच्या कोया आणून द्याव्यात.