बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात ढगफुटी झाल्याने प्रचंड नुकसान झाले. शेतीचे नुकसान तर झालेच अनेकांची घरंसुद्धा वाहून गेलीत. शेतीचे साहित्यसुद्धा वाहून गेलेत. मात्र नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही त्यांच्या बांधावर प्रशासन कधी येणार आणि नुकसानीचा पंचनामा कधी करणार, याची वाट पाहत आहेत. तीन दिवस उलटले तरीही प्रशासन आलेच नाही. कुणी मंत्री आला नाही. अधिकारी आला नाही. आमदारही आला नाही.
आता हे नुकसान कसे भरून काढावे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे. या सगळ्या नुकसानीचा आणि प्रशासनाचा रिॲलिटी चेक आमच्या टीव्ही 9 क्या प्रतिनिधीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलाय. संग्रामपूर तालुक्यातील पांचाळा गावातील शेतकरी बांधावर प्रशासनाच्या वाट पाहत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर,जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांचे ढगफुटीने प्रचंड नुकसान झाले. शेतकरी देशोधडीला लागला आहे. पंचनामे करण्यासाठी शेतकरी प्रशासनाची कालपासून वाट पाहत आहे. आजही संग्रामपूर तालुक्यातील पांचाला येथील शेतकरी सकाळपासून सव्वादोन वाजेपर्यंत कृषी सहाय्यकाची वाट पाहत बांधावर बसून होते. मात्र कृषी सहाय्यक काही आल्या नव्हत्या. सव्वादोन वाजता कृषी सहाय्यक आल्या आणि पंचनामा करण्यास सुरुवात केलीय.
मात्र राज्याचे कृषी मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा बांधावर आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांत संताप पाहायला मिळत आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सुद्धा या मंत्र्यावर टीका केली. शेतकऱ्यांच्या बांधावर न आल्याने त्यांची लाज काढलीय. तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डीक्कर यांनी यावेळी केलीय.
यवतमाळ : तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान हे महागाव, उमरखेड भागात झाले. या भागातील शेतकऱ्यांना भेट देत राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना 5 हजार रुपये सानुग्रह मदत तात्काळ देण्याचे जाहीर केले. मात्र 24 तास उलटून अद्याप शेतकऱ्यांना मदत प्राप्त झाली नाही. पुरात अडकलेल्या महागावच्या आनंदनगर येथील 48 कुटुंबाना 5 हजार रुपये प्रमाणे मिळणारी मदत ही शासन जमा झाली. उद्या याचे वाटप केले जाणार आहे. मात्र या व्यतिरिक्त अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.