बुलढाणा : बुलढाण्यातील भेंडवळमध्ये एक परंपरा आहे. या परंपरेला परिसरात तसेच राज्यात मान्यता आहे. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून ही पंरपरा पाळली जाते. यानुसार भेंडवळ गावात घट मांडणी केली जाते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी किती पाऊस पडणार, याचा अंदाज वर्तवला जातो. हा अंदाज गावातील परंपरेनुसार वर्तवला जातो. शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट, घटात पाणी व त्यावर कुरड्या. त्याच्या बाजूला पान सुपारीसह विविध १८ प्रकारची धान्ये. अशा या घट मांडणीतून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज घेतला जातो.
बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी दावा करतात की, ३५० वर्षांपूर्वीपासून अक्षय तृतीयेला ही प्रथा जोपासली जाते. या प्रथेला शेतकऱ्यांची मोठी मान्यता असते. या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमंध्ये मोठी उत्सुकता असते. राज्यातील शेतकऱ्यांचा या प्रथेवर मोठा विश्वास असतो. अशी ही घट मांडणी येत्या शनिवारी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावी होणार आहे.
यंदा किती पाऊस पडणार याची भविष्यवाणी या माध्यमातून व्यक्त केली जाते. ३५० वर्षापूर्वी या भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी ही परंपरा सुरू केली. ही प्रथा आजच्या काळात त्यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचे निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात. गेल्या तीन वर्षात देशावर कोरोनासारख्या भयंकर संकटाने आक्रमण केले होते. त्यामुळे याठिकाणी राज्यभरातून शेतकरी येऊ शकले नाहीत.
मात्र आता येणाऱ्या वर्षभरात नेमकी पावसाची, पिकांची, देशातील राजकीय स्थिती काय असणार आहे? हे या अंदाजानुसार जाणून घेण्यासाठी या वर्षी शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हे अंदाज किती खरे ठरतात. यावर शंका असली, तरी या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला तरी मात्र शेतकरी यावर मोठा विश्वास ठेवतात. आपल्या वर्षभराचे शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसार करतात, हे विशेष.
(टीप – ही बातमी परंपरेनुसार घडत असलेल्या घटनेवर आधारित आहे. याची आम्ही पुष्टी करत नाही. )