बुलडाणा : जिल्ह्यातील लोणार (Lonar), सिंदखेड राजा तालुक्यात काल सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावलीय. वीज पडल्याने लोणार तालुक्यात तीन शेळ्यांचा मृत्यू (death of goats) झाल्याची घटना ही घडलीय. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त झालीत. दुसरबीड – सिंदखेडराजा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक राहेरी पुलाजवळ झाड आडवे पडल्याने काही काळ ठप्प झाली होती. परंतु, पोलीस प्रशासनाने (police administration) पर्यायी नवीन बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून वाहतूक वळती केल्याने वाहतूक सुरळीत झाली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाली. या पावसामुळे मात्र वातावरणात गारवा निर्माण झाला. सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. उष्णतेने अंगाची काहिली होत आहे. परिसरात वादळ वारा सुरू होताच महावितरणची वीजसुद्धा गुल झाली होती. पावसाने थोडा वेळ हजेरी लावल्यावर वातावरणात गारवा पसरला.
विदर्भात तापमानात घट पाहावयास मिळाली. चार अंश सेल्सिअसनं तापमान कमी झालं. नागपुरात सर्वाधिक तापमान 39 अंश डिग्री सेल्सिअस होतं. अकोल्यात 42.5 अंश डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविलं गेलं. आकाश ढगाळलेलं होतं. बुलडाण्यात 40 अंश डिग्री सेल्सिअस तापमान होतं. चंद्रपुरात 42 अंश डिग्री सेल्सिअस तापमान होतं. आज आणि उद्या चंद्रपुरात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव व रिसोड तालुक्यातील काही गावात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. खरीप हंगामातील पूर्व तयारीत शेती मशागत कामात शेतकरी व्यस्त राहणार आहे.