संदीप वानखेडे, प्रतिनिधी, बुलढाणा : पोलीस आणि अवैध धंदे हा काही नवीन विषय नाही. अवैध धंद्यांतून पोलिसांची दोन नंबरची कमाई होते, असा आरोप केला जातो. काही ठिकाणी असे अवैध धंदे सुरू असतात. कधी-कधी छापा मारला जातो. अटकसत्र सुरू होते. पुन्हा परिस्थिती जैसे थे. काही लोकांच्या आशीर्वादामुळे हे सर्व सुरू असते. पोलीस प्रशासन कधी-कधी काही करू शकत नाही. विरोधक या अवैध धंद्याचे पुरावे देतात. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. अशीच काहीसी परिस्थिती खामगाव येथे झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकांनी केला होता. या अवैध धंद्याच्या विरोधात आता काँग्रेसने दंड थोपटले आहे. आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याचे व्हिडिओ आणून द्यावेत आणि एक हजार रुपये घेऊन जावे. असे आवाहन खामगावचे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी नागरिकांना केले होते.
त्यावरून आता हे व्हिडिओ गोळा होत आहेत. दिलीप आनंदा यांनी हे व्हिडिओ प्रसार माध्यमांना देत पोलीस अवैध धंद्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. अवैध धंदे चालकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी देखील या निमित्ताने लावून धरली आहे.
माजी आमदार खामगाव दिलीपकुमार सानंदा म्हणाले, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात मतदारसंघात सुरू आहेत. शेतकरी लालसेपोटी उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे अवैध धंदे बंद करावेत. कोणकोण अवैध धंदे करत आहेत. त्याच्या व्हिडीओ क्लीप्स पाठवल्या.
हे सर्व धंदे बंद करण्याचा शब्द दिला गेला आहे. मटका, सट्टा, अवैध दारुविक्री खुलेआम सुरू आहे. क्रिकेटचा सट्टा, चक्री हे सर्व सुरू आहे. हे सर्व पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाऊ. असं माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितलं.
विधान परिषद आमदार धीरज लिंगाडे म्हणाले, येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या कामाला पानं पुसण्याचं काम करत आहे.