बुलढाणा : लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेचा वापर केला जातो. पण, प्रवास कमी पल्ल्लाचा असेल, तर बसमधून प्रवासाला प्राधान्य दिलं जातं. पण, परिवहन विभागाच्या काही बस या भंगार अवस्थेत निघाल्या आहेत. यामुळे चालकाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. शिवाय भंगारात जाण्याऱ्या बस रस्त्यावर धावत असल्यानं प्रवाशांच्या जीवाला धोका असतो. बुलढाण्यात एक बस धूर काढत जात आहे. या धुरातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. पण, परिवहन विभाग याला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही.
एसटी महामंडळाच्या भंगार बसेसचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. एसटी महामंडळाच्या भंगार आणि नादुरुस्त बसेसमुळे अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना घडत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसाआधी ज्ञानगंगा अभयारण्यात ब्रेक फेल झाल्याने एक एसटी पलटी झाली होती. यामध्ये सुदैवाने चाळीसही प्रवाशांना काहीही झालं नव्हतं. मात्र डोंगरदऱ्यांमध्ये एसटी बसेसच्या ब्रेक फेल असणे हे गंभीर बाब एसटी महामंडळाने अद्याप गांभीर्याने घेतलेली दिसत नाही.
कारण पुन्हा एकदा अशीच एक एसटी महामंडळाची बस धूर फेकत या ज्ञानगंगा अभयारण्यातून धावताना पाहायला मिळाली. इंजीनमध्ये खराबी असल्यानंतरच अशा पद्धतीने इंजीन धूर फेकत असल्याचं तंत्रज्ञाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात ही भंगार बस धूर फेकत ज्ञानगंगा अभयारण्यातून धावत असताना एका सुज्ञ नागरिकाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
एसटी महामंडळ अशा भंगार बसेस रस्त्यावर चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत आहे का ?, असा संतप्त सवाल आता पुन्हा एकदा विचारल्या जाऊ लागला आहे. या बसमुळे प्रदूषण ही वाढत असल्याचे चित्र आहे. धूर काढणाऱ्या बस रस्त्यावरून धावणार असतील, तर प्रवासांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. गेल्या वर्षी उन्हाळ्यात काही बस पेटल्या होत्या. याला कारण असा भंगार बस रस्त्यावरून धावतात. त्यावर निर्बंध लावणे आवश्यक आहे.